Home चंद्रपुर जिल्हा विशेष ट्रॅक्टरच्या भीषण अपघातात आईचा मृत्यू, लेक गंभीर

ट्रॅक्टरच्या भीषण अपघातात आईचा मृत्यू, लेक गंभीर

456

भद्रावती : तालुक्यातील चंदनखेडा गावाजवळ बुधवारी रात्री ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या भीषण अपघातात आईचा मृत्यू झाला असून लेक गंभीर जखमी झाली आहे. ही घटना रात्री ८ वाजताच्या सुमारास बेलगाव-चंदनखेडा मार्गावर घडली.

.         भद्रावती पोलीस स्टेशन अंतर्गत गणपती वॉर्ड, गवराळा येथील प्रभाकर उद्धव निळे, बेबीबाई प्रमोद मेश्राम व वैशाली महेश तोडासे हे ट्रॅक्टर क्रमांक MH 34 CJ 1839 (ट्रॉली क्रमांक MH 34 CJ 2227) द्वारे कोकेवाडा येथील राईस मिलमध्ये धान भरडाईसाठी जात होते. दरम्यान रस्त्यावरील खड्डा चुकविताना ट्रॅक्टरचा तोल गेल्याने अपघात झाला.
ट्रॉलीवर धानाच्या पोत्यांवर बसलेल्या माय-लेकी ट्रॉलीखाली दबल्या गेल्या. यामध्ये बेबीबाई प्रमोद मेश्राम यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यांना तात्काळ चंदनखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर वैशाली महेश तोडासे या गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. प्रभाकर उद्धव निळे यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

.     घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक किशोर मुळे यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात हलविले. याप्रकरणी भद्रावती पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. फिर्यादी प्रभाकर उद्धव निळे यांच्या तक्रारीवरून ट्रॅक्टर चालक किशोर बंडू आत्राम (रा. चिरादेवी, ता. भद्रावती) याच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडविल्याबाबत भारतीय दंड संहिता २०२३ चे कलम २८१, कलम १०६ (१) तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रॅक्टर चालकास अटक केली असून पुढील तपास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

error: Content is protected !!