शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन
वरोरा : तालुक्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टी, पुरबुडाई आणि सोयाबीन पिकाच्या शंभर टक्के नुकसानीनंतर शासनाने जाहीर केलेली मदत अद्याप अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. काहींना तुटपुंजे अनुदान तर अनेकांना अजिबातच मदत न मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदन देत तात्काळ चौकशीची मागणी केली.
. वरोरा तालुक्यातील डोंगरगाव आणि डाहाळा (रिठ) या गावांमध्ये सुमारे २५ टक्के शेतकऱ्यांना काही प्रमाणात अनुदान मिळाले असल्याची माहिती मिळते. मात्र उर्वरित शेतकरी अद्याप प्रतिक्षेत आहेत. शेतकऱ्यांनी माहिती घेताना डोंगरगाव येथील तलाठी शेतकऱ्यांशी उद्धट भाषेत वागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. “तुम्हाला काय करायचे ते करून घ्या” अशा अवमानकारक शब्दांत संबोधल्याची तक्रारही निवेदनात नमूद केली आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, पुरबुडाई, सोयाबीन पिकाचे नुकसान आणि रब्बी हंगामासाठी बियाणे खरेदीसाठी शासनाने जाहीर केलेल्या मदतीचे पैसे तातडीने मिळणे आवश्यक आहे. अन्यथा आगामी हंगामावर परिणाम होणार आहे.
. या संदर्भात शेतकरी नेते तथा सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. संबंधित प्रकरणाची त्वरित तपासणी करून पात्र शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


