संतप्त शेतकरी रस्त्यावर ; एक तास वाहतूक ठप्प
नंदोरी बु. येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन
आंदोलनानंतर व्यापाऱ्यांनी कापसाला दिला भाव
भद्रावती : सोयाबीन आणि कापसाला योग्य दर मिळत नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शनिवारी चंद्रपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील मे. आदिती कॉटन इंडस्ट्रीज टाकळी – नंदोरी बु. जिनिंग समोरच वाहने उभे करुन तीव्र आंदोलन छेडले. कापसाला योग्य भाव द्यावा या प्रमुख मागणीसाठी करण्यात आलेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे तब्बल एक तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
![]()
. भद्रावती तालुक्यातील नंदोरी – टाकळी येथील मे. आदिती कॉटन इंडस्ट्रीज येथे सीसीआय (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) अंतर्गत कापूस खरेदी केंद्र आहे. मात्र सिसीआय कापूस खरेदी सुरु व्हायची आहे. शनिवारी शेतकऱ्यांनी येथे कापूस विक्रीसाठी आणला असता व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या कापसाला 6 हजार पाचशे रुपये भाव देण्यात आला. कवडीमोल दर देण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली. शासनाने जाहीर केलेल्या आधारभूत दरापेक्षा कमी दरात खरेदी होऊ लागल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत रस्त्यावर उतरले. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी कापूस सोबतच सध्याचे सोयाबीनचे दर उत्पादन खर्चही भागत नाहीत. खत, बियाणे, मजुरी आणि पिकावर केलेल्या खर्चानुसार मिळणारा भाव अत्यंत तुटपुंजा असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शासनाने तात्काळ सोयाबीन व कापसाचा हमीभाव वाढवून द्यावा, अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली.
. शेतकऱ्यांनी कापूस भरलेली वाहने रस्त्यावर उभी करत काही शेतकरी रस्त्यावर बसल्याने महामार्गावरील वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला. पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या आंदोलनानंतर 6500 रुपये असलेला भाव व्यापाऱ्यांनी 7073 रुपये केल्याने आंदोलक शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.


