नगराध्यक्ष पदाच्या सोडतीने अनेकांचे राजकीय गणित बदलले
इच्छुकांमध्ये निराशा, तर महिलांमध्ये उत्साहाची लाट
चंद्रपूर/ बल्लारपूर : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांची तयारी वेगाने सुरू असताना, आज सोमवारी मुंबई मंत्रालयात नगरविकास विभागामार्फत नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीत चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणाचा चेहरामोहराच बदलला असून, तब्बल ८ ठिकाणी महिलांना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.
. जिल्ह्यातील एकूण १७ नगरपालिका आणि नगरपंचायतींपैकी ८ ठिकाणी महिलांना आरक्षण मिळाल्याने महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार असली, तरी अनेक दिग्गज इच्छुकांना या निकालाने चांगलाच धक्का बसला आहे. यामुळे अनेकांचे राजकीय समीकरण विस्कटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
. जिल्ह्यातील सर्वात मोठी बल्लारपूर नगरपालिका नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) साठी आरक्षित ठरली आहे. याचबरोबर वरोरा, मूल, चिमूर, घुग्घुस, जिवती, गोंडपिपरी आणि सावली या आठ नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये महिलांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडणार आहे. तर भद्रावती (नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण), राजुरा (सर्वसाधारण), ब्रम्हपुरी (नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण), गडचांदूर (सर्वसाधारण), नागभीड (अनुसूचित जाती सर्वसाधारण) अशा नगरपालिकांमध्ये पुरुष उमेदवारांना संधी राहणार आहे.
. नगरपंचायतींच्या आरक्षणात कोरपना (अनुसूचित जमाती सर्वसाधारण), पोभूर्णा (नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण), सिंदेवाही (अनुसूचित जमाती सर्वसाधारण) व भिसी (अनुसूचित जाती सर्वसाधारण) असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
. नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणानंतर आता सर्वांचे लक्ष ७ आणि ८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीकडे लागले आहे. या सोडतीनंतर प्रत्येक पक्षात उमेदवारीची लगबग वाढणार असून, सत्तेसाठी नवे समीकरण आणि राजकीय मोर्चेबांधणी सुरू होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.


