भद्रावतीत संतापाची लाट
तहसीलदार, नायब तहसीलदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
भद्रावती : तालुक्यातील कुरोडा येथील शेतीसंबंधी प्रकरणात न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी न करता व शेतकऱ्यांकडून पैसे घेऊनही जमिनीचे फेरफार न केल्याने निराश झालेल्या अर्जदार परमेश्वर विश्वनाथ मेश्राम (५५) रा. मोरवा यांनी 26 सप्टेंबर 2025 रोजी तहसील कार्यालयात विषप्राशन केले होते.
. गंभीर अवस्थेत त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, दहा दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत अखेर आज पहाटे ३ वाजता मेश्राम यांचे निधन झाले.
. या घटनेमुळे मेश्राम परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि कुटुंबियांना तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
. मेश्राम यांनी कुरोडा येथील सर्वे क्रमांक 86, 87, 95, 98 मधील शेतजमिनीवर 2015 च्या न्यायालयीन आदेशानुसार वारसांची नावे अभिलेखात नोंदविण्याची मागणी केली होती. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी आदेशाची अंमलबजावणी न करता “मालकी हक्काबाबत वाद आहे” असे नमूद करून अर्ज निकाली काढला. न्यायासाठी अनेक वर्षे धडपड करूनही यश न मिळाल्याने त्यांनी आत्मघाताचे पाऊल उचलले.
. या प्रकरणी शासनाने गंभीर दखल घेतली असून, महसूल अधिनियम 1966 आणि महाराष्ट्र नागरी सेवा आचारसंहिता नियम 1969 च्या उल्लंघनाबद्दल तहसीलदार भांडारकर आणि नायब तहसीलदार खांडरे यांना निलंबित करण्यात आले आहे. शासनाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांनी निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. दरम्यान, तहसीलदार भांडारकर यांच्या कार्यकाळात अवैध रेती उत्खनन, कार्यालयीन गैरहजेरी, लोकअदालतीत अनुपस्थिती, तक्रारी प्रलंबित ठेवणे अशा अनेक तक्रारी प्रलंबित होत्या. त्यामुळे नागरिकांत प्रचंड नाराजी होती. मेश्राम यांच्या मृत्यूनंतर प्रशासनाविरोधात तीव्र भावना उसळल्या असून या घटनेमुळे महसूल विभाग हादरला आहे.


