Home चंद्रपुर जिल्हा विशेष आईच्या डोळ्यात उमललेलं स्वप्न क्षणात विरलं…

आईच्या डोळ्यात उमललेलं स्वप्न क्षणात विरलं…

671

पुराच्या पाण्यात गमावलं ममतेचं लेकरं

पुराच्या पाण्यामुळे वैद्यकीय मदत न मिळाल्याने नवजात बाळाचा मृत्यू

किशोर डुकरे / रवी खाडे

वरोरा / चंद्रपूर : दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने ग्रामीण भागात हाहाकार माजवला आहे. रस्ते वाहून जाणे, नाले तुडुंब भरणे, गावांचा संपर्क तुटणे या संकटात बोडखा मोकाशी गावातील एका गर्भवती महिलेच्या पोटी जन्मलेल्या बाळाला वैद्यकीय मदत न मिळाल्याने मृत्यू ओढवला. आईच्या कुशीत येताच बाळाची श्वासांची दोरी थांबली आणि गावभर शोककळा पसरली.

.        वरोरा तालुक्यातील बोडखा मोकाशी गावातील पूजा सतिश तुराळे (27) या महिलेला सोमवारी मध्यरात्री अचानक प्रसूतीवेदना सुरू झाल्या. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने कोसरसार प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र गावातून केंद्राकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर नाल्याला पूर आल्याने मार्ग पूर्णपणे बंद झाला होता. जोरदार पाण्याच्या प्रवाहामुळे गावाबाहेर पाऊल ठेवणेही शक्य नव्हते. गावकऱ्यांनी आशा सेविका पेंदोर यांना बोलावले. त्यांच्याच देखरेखीखाली पूजाची प्रसूती झाली. मात्र वैद्यकीय सोयीसुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव यामुळे दुर्दैवाने बाळाने जन्मानंतर काही क्षणांतच प्राण सोडले. आईला मात्र गावकऱ्यांनी मोठ्या धीराने सावरण्याचा प्रयत्न केला.

.         सकाळी पाणी काहीसे ओसरल्यानंतर गावातील तरुणांनी एकत्र येऊन पूजाला आरोग्य केंद्रात पोहोचवले. तुळशीराम तुराळे, रुपेश तुराळे, तुषार बलखंडे, तन्वीर थाटे, दिनेश तुराळे, दिलीप तुराळे, विकिल थाटे, साहिल कामडी, तुळशीराम उगे यांसारख्या ग्रामस्थांनी रात्रभर जागरण करून आईच्या आरोग्याची काळजी घेतली. गावातील ऐक्यामुळे पूजाचे प्राण वाचले, पण बाळाचा जीव वाचवता आला नाही.

.       या दुर्दैवी घटनेमुळे ग्रामस्थांत संताप उसळला आहे. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली. नुकत्याच जन्मलेल्या बाळाचे गमावलेले प्राण पाहून गावातील अनेकांनी अश्रू अनावर केले. पूजाच्या डोळ्यांत सतत अश्रू असून, आई होण्याचा आनंद मिळण्याआधीच मातृत्वाने तिला मरणयातना दिल्या. “दरवर्षी पावसाळ्यात हा नाला तुडुंब भरतो. त्याची खोली वाढवली असती आणि पुलाची उंची सुधारली असती तर गावाचा संपर्क तुटला नसता. आज एका बाळाचा जीव गेला, उद्या आणखी कोण बळी जाणार?” असा सवाल ग्रामस्थांनी केला.

error: Content is protected !!