शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची नासाडी
खरीप हंगामाला मोठा फटका
बल्लारपूर : मागील चार पाच दिवसापासून पावसाच्या जोरधारा बरसत आहे. अशातच इरई धरणातील सातही दरवाज्यातून पाणी विसर्ग केल्या जात आहे. परिणामी वर्धा व इरई नदीच्या काठावरील शेतपिके पाण्याखाली आली आहे. शेतकरी उघड्या डोळ्यांनी पिकांची नासाडी पाहत आहे.यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. याचा सर्वाधिक फटका बल्लारपूर तालुक्यातील हडस्ती,चारवट,नांदगाव (पोडे), विसापूर, बल्लारपूर, बामणी, दहेली,लावारी,कळमना,आमडी आदी भागातील हजारोवर शेतकऱ्यांना बसला आहे. याला कारणीभूत इरई धरणातील पाण्याच्या विसर्ग असल्याचा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ पाटील टोंगे यांनी केला आहे.
. ऐन पोळा सणाच्या दोन दिवसा अगोदर वर्धा नदीच्या पुराने शेतकऱ्यांची दैनावस्था केली. शेकडो हेक्टर मधील पिकांची पुराने नासाडी झाली.मात्र शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे अद्याप झाले नाही.अशातच इरई धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने १५ दिवसात दुसऱ्यांदा शेतकऱ्यांना हवालदिल केले आहे.
. बल्लारपूर तालुक्यातील कृषीक्षेत्र कोरडवाहू आहे. निसर्गाच्या जलचक्रावर कृषी व्यवसाय अवलंबून आहे. मात्र मानव निर्मीत इरई धरणातील पाण्याच्या विसर्ग शेतकऱ्यांच्या जीवावर नेहमी उठत आहे. परिणामी हातात येणारे कापूस, सोयाबीन, भात, तूर,भाजीपाला व अन्य कडधान्य पिकांची पुराने नासाडी झाली आहे. इरई नदीपात्राचे खोलीकरण करण्यात आले.मात्र पूरस्थितीने याचे पितळ उघड केले आहे. इरई धरणातील पाण्याच्या विसर्ग शेतकऱ्यांना उद्धवस्त करणारा ठरला आहे.
पुराने नेहमी शेतजमीन खरवडून जाते. मात्र नुकसान भरपाई देताना याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना चंद्रपूर जिल्ह्यात कधीच चारा डेपो देण्यात आला नाही. शासनस्तरावरून निर्णय घेतला जाते. मात्र त्याची अंमलबजावणी केवळ विशीष्ठ भागातच केली जाते. हे आमच्या भागातील शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे. जनप्रतिनिधि देखील यावर बोलत नाही. ही खंत आहे.
रामभाऊ पाटील टोंगे, माजी सभापती, कृषी उत्पन्न बा.समिती, चंद्रपूर.


