किसान ब्रिगेड कर्जमुक्ती चळवळीला शेतकर्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
वरोरा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रचारादरम्यान निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल असे आश्वासित केले होते तसेच त्यांच्या जाहीरनाम्यातही उल्लेख केला होता. तथापि सरकार स्थापन होऊन सहा महिन्याचा कालावधी उलटूनही अद्याप पर्यंत कर्जमाफीची कोणतीच घोषणा नाही याउलट विद्यमान उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी होणार नाही असे बजावले. मुख्यमंत्र्यांना कर्जमाफीचा विसर पडल्याने किसान ब्रिगेड कर्जमुक्ती चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी तहसीलदार वरोरा यांना कर्जमुक्तीचे अर्ज देण्यात आले.
. या कर्जमुक्ती अर्जात म्हटले आहे की राज्यात शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. शेतमालाला भाव नाही, बँका कर्ज देत नाही. या बाबी मुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. आणि शासनाचे कर्जमाफी बाबत नकारपट पाहता मागील सहा महिन्यापासून शेतकरी आत्महत्या ची प्रकरणे दहा पटीने वाढली आहेत. या आकडेवारी वरून दिसून येते की या सर्व बाबीवर कर्जमाफी हाच एकमेव उपाय आहे. त्याकरिता किसान ब्रिगेडने कर्जमुक्ती अभियान राबवून शेतकऱ्यांचा आवाज शासन दरबारी बुलंद करण्याचा प्रयत्न करीत आहे. 14 मे 2025 रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी किसान ब्रिगेड संघटनेने शेतकऱ्यांचे कर्जमुक्ती अर्ज भरून जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय व तालुकास्तरावर तहसील कार्यालय यांचे कडे जमा करण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून शेतकऱ्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचविला जाईल
. यावेळी कर्जमुक्ती अर्ज तहसीलदार वरोरा यांना देतांना शेतकरी किशोर डुकरे, दिंगाबर खापणे, मदन भट, सूर्यभान भट, अविनाश आगलावे, उमेश टोंगे, मनोज काळे, सुधाकर डुकरे, विनोद उमरे, सुनिल निब्रड, अविनाश पावडे, अमृत धवणे, श्रीकृष्ण देवतळे, विनोद डुकरे, अनिल बतकी, संदीप वासेकर, मुरलीधर कुबडे, आदिसह मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते.


