शेतकरी झाला भूमिहीन
न्यायासाठी शेतकर्यांचे 17 दिवसांपासून आमरण उपोषण
चंद्रपुर : वरोरा तालुक्यातील आबमक्ता या गावामध्ये गेल्या 40 वर्षापासून वनहक्काच्या अतिक्रमित जागेवर शेती करीत असलेल्या शेतकर्याच्या शेतात महावितरणच्या 13 केव्ही सबस्टेशनसाठी ग्राम पंचायतने ठराव घेत सदर शेतजमीन महावितणला दिली. परिणामी शेतकरी भूमिहीन झाला असून त्याचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. न्यायासाठी आता शेतकर्याने शेतातच आमरण उपोषणाचे हत्यार उपसले असून मागील 17 दिवसापासून ते आमरण उपोषण करीत आहे.
![]()
. वरोरा तालुक्यातील आबमक्ता येथील शेतकरी बाळकृष्ण खोब्रागडे हे मागील 40 वर्षापासून वनहक्काच्या अतिक्रमित जागेवर शेती करीत आहे. बाळकृष्ण खोब्रागडे हे वयोवृद्ध झाल्याने आता त्याचा मुलगा विकास हा शेती सांभाळत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. उपजीविकेसाठी शेती हे एकमेव साधन आहे. मात्र सन 2021 मध्ये महावितरण कंपनीने या परिसरात असलेल्या विद्युत ग्राहकांना विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून 13 केव्हीचे सबस्टेशन बनविण्यासाठी आबमक्ता ग्राम पंचायतला जागेची मागणी केली. त्यानुसार ग्राम पंचायतने वनहक्काच्या सर्व क्रमांक 83 मधील 60 आर जागा महावितरणला देण्यासाठी ग्राम पंचायतने ठराव मंजूर करीत महावितरणच्या ताब्यात दिली. त्यानुसार महावितरणने सर्व नं 83 मध्ये सिमांकन केले. मात्र या सर्वे नंबर मध्ये बाळकृष्ण खोब्रागडे हे 40 वर्षापासून शेती करत असतांना ही जागा महावितरणला दिल्याने शेतकर्यासमोर मोठा यक्ष प्रश्न पडला आहे. वाहतीत असलेल्या शेतजमीनीवर महावितरणचे सबस्टेशन उभे होणार असल्याने खोब्रागडे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून भूमिहीन झाले आहे. प्रशासनाने सर्वे नंबर 83 ची मोजणी करून वापरात असलेली व माझ्या ताब्यातील 60 आर जागा मला देण्यात यावी यासाठी आमदार करण देवतळे, जिल्हाधिकारी, तहसीलदार, ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदने दिली. मात्र न्याय मिळत नसल्याने अखेर विकास खोब्रागडे यांनी 11 एप्रिल 2025 पासून त्याच शेतात आमरण उपोषणाला बसले आहे. मात्र 17 दिवस लोटूनही प्रशासनाने आंदोलनाला भेट सुद्धा दिली नाही. आपले हक्क व अधिकार मिळविण्यासाठी घटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करून आमरण उपोषणाचा अन्यायग्रस्त शेतकरी करत आहे. मात्र प्रशासकीय अधिकार्याकडूनच अन्याय होताना दिसत आहे.
प्रशासनाकडून शेतकर्याची दिशाभूल शेतकरी विकास बाळकृष्ण खोब्रागडे हे सर्वे नं 83 या अतिक्रमित जागेवर 40 वर्षापासून शेती करत आहे. मात्र प्रशासन त्यांचेकडून सर्वे नं 92 चा कर वसूल करत आहे. तशी पावती शेतकर्यांना देण्यात आली. त्यामुळे सर्वे नं 92 ही जमीन माझी आहे असा समाज अशिक्षित शेतकर्याला झाला होता. जेव्हा त्या जागेवर महावितरणने सबस्टेशन चे सिमांकन केले. तेव्हा प्रशासनाकडून आपली फसगत झाल्याचे शेतकर्याच्या लक्षात आले असून प्रशासनाने आपल्याला अंधारात ठेवत भूमिहीन केल्याचा आरोप शेतकर्यांनी केला.
अन्यायग्रस्त शेतकर्याला भीम आर्मीचा पाठिंबा सर्वे नं 83 मध्ये 2 हेक्टर 91 आर जागा आहे. त्यापैकी 60 आर जागेत विकास खोब्रागडे हे शेती करत आहे. उर्वरित जागा ही गावातीलच एका सदन शेतकर्याच्या ताब्यात आहे. त्या शेतकर्याकडे वनहक्क अतिक्रमित जागा मोठ्या प्रमाणात असतांना ही हेतु पुरस्पर विकास खोब्रागडे यांच्या वाहतीत असलेल्या शेतजमिनीवर महावितरणचे सबस्टेशन उभारण्यात येत असल्याने त्या शेतकर्यावर अन्याय होताना दिसत आहे. 17 दिवसापासून शेतातच उपोषणाला बसले असतांना लोकप्रतिनिधी किंवा प्रशासकीय अधिकार्यांनी साधी भेटही दिली नाही. ही खेदाची बाब आहे. शेतकर्यावर होत असलेला अन्याय आम्ही कदापी सहन करणार नाही. येत्या 15 दिवसात प्रशासनाने लक्ष न दिल्यास आंदोलन पुकारण्यात येईल असा ईशारा भीम आर्मी चे अतुल पाटील, भाग्यश्री पवार, अजिंक्य ढोक, मंगेश पवार, शंकर मुन आदींनी एका पत्रकार परिषदेत दिला आहे.


