गाव एका तालुक्यात तर ग्रामपंचायत दुसऱ्या तालुक्यात
ग्रामस्थांची गैरसोय
गावे विकासापासून वंचित
कोरपना : निवडणूक उत्सवादरम्यान मतदारांचे मतदान केंद्र बदलतात हे आपण ऐकले व पाहले आहेत. मात्र चंद्रपुर जिल्ह्यातील तीन तालुक्यातील गावांच्या ग्रामपंचायती दुसर्या तालुक्यात विभागल्याने गावातील विकास कामे खोळंबली आहे. तर ग्रामस्थांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. मात्र ही गावे अजूनही मागासली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
. कोरपना तालुक्यातील नवेगाव, हिरापूर, कारगाव बूज ही गावे एका तालुक्यात तर त्यांची ग्रामपंचायत दुसऱ्या तालुक्यात असल्याने गावकऱ्यांना प्रशासकीय कामासाठी अडचण निर्माण होत आहे. परंतु तीन दशकाहून अधिकचा कालावधी लोटून ही गावांच्या या समस्येवर शासन दरबारी मार्ग निघाला नाही. नवेगाव हे गाव कोरपना तालुक्यात आहे. परंतु या गावाची ग्राम पंचायत राजुरा तालुक्यातील वरोडा आहे. हिरापुर गाव राजुरा तालुक्यात समाविष्ट असून ते गाव कोरपना तालुक्यातील निमणी ग्राम पंचायत मध्ये सलग्न आहे.कारगाव बूज गाव कोरपना तालुक्यात असून या गावाची ग्राम पंचायत जिवती तालुक्यातील धनकदेवी आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना प्रशासकीय कामात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते आहे. या स्थानिक गावाच्या प्राकृतिक सोयीच्या दृष्टिकोनातून नवेगाव ला बाखडी , हिरापूरला चिंचोली , कारगाव बूज धानोली किंवा पिपर्डा ग्रामपंचायत शी संलग्न करावे. ज्या माध्यमातून गावाचा तालुका व ग्रामपंचायत एकाच तालुक्यात राहील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याच बरोबर जिवती तालुक्यातील सिगारपठार गावाला कोरपना तालुक्यात जोडून येरगव्हाण ग्रामपंचायत शी हे गाव सलग्न करण्यात यावे. तसेच मानोली , बैलमपूर , वरझडी , नोकारी ही गाव सुद्धा मंडळ, तलाठी साजा, ग्रामपंचायतीचे दृष्टीने योग्य सलग्नीकरण करून कोरपना तालुक्यात जोडण्यात यावे जेणेकरून ग्रामस्थांना सोयीचे ठरेल.
त्यांची ही पुनर्रचना करावी तालुक्यातील अनेक गावाच्या गट ग्रामपंचायत , गाव हद्द, पोस्ट , पोलीस स्टेशन , वन, कृषी, तलाठी, मंडळ, आरोग्य , शिक्षण, पशुसंवर्धन, विद्युत विभागाच्या हद्दी वेगवेगळ्या आहे. त्यांचाही पुन आढावा घेऊन त्यांचे योग्य सलगीकरण करून ग्रामस्थांची अडचण दूर सारावी अशी मागणी होते आहे.


