रापम आणि पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष
राजुरा : शहरातील जुने बस स्थानक पाडून त्या ठिकाणी नव्या बस स्थानकाचे बांधकाम काम सुरू आहे. या बसस्थानक वरील गैरसोयीमुळे मोठ्या अपघाताला आमंत्रण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या बाबत दैनिक नवजीवन ने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची भविष्यवाणी आज प्रत्यक्षात घडली. गुरवारी दुपारच्या सुमारास एका विद्यार्थिनीला महामंडळाच्या बसने बसस्थानकाजवळ धडक दिली. यात ती गंभीर जखमी झाली. मात्र सुदैवाने ती बचावली.
. राजुरा येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी नव्या संतोष वांढरे राहणार पंचाळा ही गावाकडे जाण्यासाठी बसस्थानकावर आली. दरम्यान महामंडळाची बस बसस्थानकावर येत असताना याच परिसरात वालकंपाऊंड च्या बाजूने विद्यार्थिनीला जबर धडक दिली. यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली, तीच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला जबर मार लागल्याने सी. टी. स्कॅन करून पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. सुदैवाने ती बचावली. राजुरा आगाराने बस स्थानकासाठी दुसर्या जागी तात्पुरती व्यवस्था करणे गरजेचे होते. मात्र ते केले नसल्याने या ठिकाणी मोठा अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यावरून हे निर्माणाधीन बसस्थानक नागरिकांच्या जीवाशी खेळ करीत असल्याचे दृष्य सामोर येत आहे.
. दरम्यान बसस्टॉप चे बांधकाम होत असताना कंत्राटदार तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यांनी आवश्यक खबरदारी घेऊन व पर्यायी व्यवस्था करून निर्माण कार्य करण्याची आवश्यकता असते मात्र या ठिकाणी अशा पद्धतीची कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. तसेच वाहतूक पोलीस यंत्रणा अशा ठिकाणी सदैव तैनात ठेवून नागरिकांना संरक्षण देण्याची गरज असते मात्र राजुरा शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या आणि वरदडीच्या ठिकाणी असलेल्या या बसस्टँड परिसरात अशा पद्धतीची काळजी सुद्धा घेतली जात नसल्याची माहिती आहे. त्यामुळे आज या अपघातात विद्यार्थी थोडक्यात बचावली असली तरी भविष्य काळामध्ये प्रशासनाच्या कंत्राटदारांच्या व अधिकाऱ्यांच्या भेजबाबदार वागण्यामुळे मोठ्या दुर्घटना होऊन नागरिकांचे जीविताचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता या दुर्घटनेनंतर येथे निर्माण कार्य करणारे कंत्राटदार, संबंधित विभागाचे अधिकारी तथा वाहतूक पोलीस यंत्रणा यापासून काय बोध घेणार आणि नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी कुठले उपाययोजना अमलात आणणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
रा.प.म.चे अधिकारी जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असून चंद्रपूर विभागातील अनेक गैर प्रकार दडपल्या जात आहेत, दोषी अधिकाऱ्यावर योग्य कार्यवाही ची मागणी करण्याकरिता दोन दिवसात राजुरा विद्यार्थी संघटना मुंबई मध्यवर्ती कार्यालय येथील रापम चे उपाध्यक्ष डॉ. माधव कुसेकर यांची भेट घेणार आहे. प्रविन मेकर्तीवार, अध्यक्ष, राजुरा विद्यार्थी संघटना


