Home चंद्रपुर जिल्हा विशेष जानेवारी महिन्यातच पिण्याच्या पाण्यासाठी टाहो 

जानेवारी महिन्यातच पिण्याच्या पाण्यासाठी टाहो

1083

“हर घर नल, घर घर नल” योजना कुचकामी

सिंदेवाही : पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या सिंगडझरी गावात जानेवारी महिन्यातच पिण्याच्या पाण्याचा भीषण दुष्काळ पडलेला असून ग्राम पंचायत मार्फत लावलेल्या सोलर पंपावर अफाट गर्दी असल्याने शेवटपर्यंत असणाऱ्या नागरिकांना बादलीभर पाणी सुद्धा मिळत नाही. त्यामुळे नागरिकांनी ग्राम पंचायत प्रशासना विरुद्ध संताप व्यक्त करून तात्काळ पाण्याची समस्या दूर करावी. अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

.      सिंदेवाही पासून ११ किलोमिटर अंतरावर असलेल्या सिंगडझरी या गट ग्राम पंचायतची ११०० लोकसंख्या असून सिंगडझरी येथे जल जीवन मिशन अंतर्गत ” हर घर नल, घर घर नल ” या योजनेअंतर्गत लाखो रुपये किमतीची नळ योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र ती नळ योजना अजुनपर्यंत पूर्णत्वास गेली नाही. त्यामुळे  सिंगडझरी येथे सध्या पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत्र म्हणून गावातील दोन हातपंपावर सोलर पंप लावून नागरिकांसाठी पाण्याची सोय केली आहे. परंतु आंबेडकर वॉर्डातील हातपंप मध्ये बिघाड आला असून सकाळी दहा वाजता पंप सुरू होऊन दुपारी दोन वाजता बंद होत असल्याने नागरिकांना सकाळ पासून पिण्याच्या पाण्यासाठी नंबर लावून ठेवावा लागत आहे. नागरिकांची अफाट गर्दी असल्याने आणि दुपारी दोन वाजता सोलर पंप बंद होत असल्याने शेवटच्या नागरिकांना रिकामा गुंड घेऊन घरी परतावे लागत आहे. ग्राम पंचायत कार्यालयातील सरपंच व सदस्यांचा कार्यकाळ संपला असल्याने ग्राप पंचायत वर प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे.

.      प्रशासक हे पंचायत समिती मधील कर्मचारी असल्याने त्यांना त्याच कार्यालयातील कामाकडे लक्ष घालावे लागत आहे. त्यामुळे ग्राम पंचायत कडे लक्ष देणारा कोणताच वाली उरलेला नाही. ग्राम पंचायतीचे ग्राम पंचायत अधिकारी यांनी या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष न करता नागरिकांच्या मूलभूत सोय सुविधेकडे लक्ष घालून नागरिकांच्या समस्या मार्गी लावाव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

error: Content is protected !!