Home चंद्रपुर जिल्हा विशेष जिल्हा बँकेतील नोकरभरतीची सर्वंकष चौकशी होणार

जिल्हा बँकेतील नोकरभरतीची सर्वंकष चौकशी होणार

1107

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

चंद्रपूर : जिल्हा बँकेतील नोकरभरतीची सर्वंकष चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीद्वारे झालेल्या चर्चेत दिल्यानंतर भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मनोज पोतराजे यांनी माजी मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते लिंबूपाणी पिऊन उपोषणाची सांगता केली. मागील १४ दिवसांपासून पोतराजे यांचे आमरण उपोषण सुरू होते. यादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने उपचारदेखील करावे लागले होते. जिल्हा बँकेतील नोकरभरती रद्द करावी तसेच आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी आरक्षण बचाव संघर्ष समितीने २ जानेवारीपासून आंदोलन सुरू केले.

.        १६ जानेवारीपासून मनोज पोतराजे, तर २१ जानेवारीपासून रमेश काळबांडे आमरण उपोषणाला बसले होते. या नोकरभरती प्रकरणाची उच्चस्तरीयच चौकशी करावी, या मागणीसाठी मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देण्यात आले. पोतराजे यांच्या उपोषणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी बुधवारी दुपारी पोतराजे यांच्यासोबत भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधला व सविस्तर चर्चा केली. नोकर भरतीच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत. भरतीप्रक्रियेत जी अनियमितता झाली, त्याचीही चौकशी होईल. त्यामुळे आपण उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. यानंतर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पोतराजे आणि काळबांडे यांनी उपोषण सोडले.

‘ईडी’कडूनही चौकशी !                                                                                                                                                                   जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ३५८ पदांच्या भरतीप्रक्रियेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. याप्रकरणी आपचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, आदित्य नंदनवार आणि रोहन गुजेवार यांनी थेट नवी दिल्ली गाठून सक्तवसुली संचालनालय (ईडी) कार्यालयात तक्रार दाखल केली.

कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप                                                                                                                                                      बँकेतील भरती प्रक्रियेत मागासवर्गीयांचे (एससी, एसटी, ओबीसी व महिला) आरक्षण काढून टाकण्यात आले आहे. ३१ हजारांपेक्षा अधिक उमेदवारांपैकी केवळ तीन जिल्ह्यांतील (चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ) उमेदवारांची निवड करण्यात आली. याशिवाय निवड झालेले उमेदवार बँकेशी संबंधित असल्याचेही उघड झाले आहे. या प्रक्रियेत कोट्यवधींची देवाणघेवाण झाल्याचा आरोपही आपने केला आहे.

मुंडन आंदोलनानंतर चौदावीचा कार्यक्रम                                                                                                                                           सीडीसीसी बैंकेच्या नोकर भरतीत मागासवर्गीय एससी, एसटी व ओबीसी यांचे आरक्षण हटवून संविधानाची हत्त्या केल्याने आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून मुंडन आंदोलन करुन निषेध केला होता, दरम्यान आज शेवटच्या दिवशी सीडीडीसी बैंकेचा भ्रष्टाचारांचा विटाळ संपविण्यासाठी आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या सदस्यांनी चौदावी चा कार्यक्रम घेऊन भ्रष्टाचारी संचालक यांच्या नावाने पत्राळ तयार केली व ती बैंकेच्या समोर पूजा करुन ठेवली आणि उपस्थित कार्यकर्त्यांना जेवण दिलं.                                                                                                                                                                   या आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीत सामील समन्वयक राजू कुकडे, उपोषणकर्ते मनोज पोतराजे रमेश काळबांधे संजय कन्नावार, सूर्या अडबाले, बंडू हजारें, अनुप यादव, नभा वाघमारे, राजू बिट्टूलवार, राजेश बेले, मिलिंद खोब्रागडे, महेंद्र खंडाळे, दिनेश एकवणकर, अभी वांढरे, प्रमोद देरकर व असंख्य समाज संघटनाच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!