आमरण उपोषणाला विविध संघटनांचा पाठिंबा
चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीतील मागासवर्गीय ओबीसी, एससी, एसटी तरुणांचे आरक्षण डावलल्याच्या विरोधात मनोज पोतराजे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला विविध संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनाला जन विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी नगरसेवक पप्पू देशमुख, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, तसेच राष्ट्रीय एबीपी महासंघाचे विद्यार्थी अध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी भेट देऊन उभा पाठिंबा दिला आहे.
जिल्हा बँकेने नोकरभरती करताना एससी, ओबीसी, एसटी आणि महिला आरक्षण ठेवले नाही. जोपर्यंत यांसदर्भातील न्यायालयीन याचिकेवर निर्णय येणार नाही. तोपर्यंत उमेदवारांना नियुक्तीपत्र देवून नये. ही भरती रद्द करावी. परीक्षा घेणारी आयटीआय कंपनी आणि संचालकांची चौकशी करावी, यासाठी भाजपच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मनोज पोतराजे 16 जानेवारी पासून जिल्हा बँकेच्या मुख्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहे. शुक्रवारी दुपारी मान्यवरांनी उपोषण स्थळी भेट दिली. त्यांनी पोतराजेंशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांबद्दल समर्थन व्यक्त केले. प्रशासनाने या मागण्यांचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सर्व स्तरांवर व्यक्त होत आहे.
उपोषण कर्त्यांच्या मागण्या आयटीआय कंपनीने घेतलेल्या परीक्षेचे कट-आउट गुण आणि परीक्षार्थींच्या गुणांची यादी प्रकाशित करावी, सिडीसीसी बँकेचे कालबाह्य संचालक मंडळ बरखास्त करून नव्याने निवडणूक घेण्यात यावी, आरक्षण डावलल्याच्या चौकशीसाठी एसआयटी गठित करावी, मुलाखतीचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग सर्वांसमोर जाहीर करावे, परीक्षेतील घोळ दूर करण्यासाठी पारदर्शक कंपनीमार्फत नव्याने परीक्षा घेतली जावी.


