खासदार प्रतिभा धानोरकर यांचा शाळांना कडक इशारा
४५ अंशांचा पारा लक्षात घेता प्रशासनाने कडक लक्ष ठेवण्याचे आवाहन
नियम मोडणाऱ्या शाळांविरुद्ध ‘गांधीगिरी’ मार्गाने होणार आंदोलन
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्याचा पारा सध्या ४५ अंश सेल्सिअसच्या पार गेला असून, ही तीव्र उष्णतेची लाट लहान विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत चिंताजनक बनली आहे. या भीषण परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून जिल्हा परिषद शिक्षण विभागाने २ मे २०२६ पासून सर्व शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. मात्र, वाढत्या उष्णतेकडे दुर्लक्ष करून काही खाजगी शाळा केवळ व्यावसायिक कारणांसाठी वर्ग सुरू ठेवण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, “कोणत्याही खाजगी शाळेने विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळू नये,” असे आवाहन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
वेळेचे बंधन आणि सुट्ट्यांचे नियोजन
शासकीय आदेशानुसार, १५ जून ते २७ जून या कालावधीत शाळा सकाळी ७ ते ११:४५ या वेळेतच भरवणे बंधनकारक आहे. ४५ अंशांच्या या रणरणत्या उन्हात विद्यार्थ्यांना शाळेत बोलावणे त्यांच्या जिवावर बेतू शकते. त्यामुळे शाळांनी नियमांचे उल्लंघन करू नये, असा स्पष्ट इशारा खासदारांनी दिला आहे.
नियम मोडल्यास ‘गांधीगिरी’ मार्गाने आंदोलन
खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सूचनेनुसार, जर जिल्ह्यातील कोणत्याही खाजगी शाळेने प्रशासकीय निर्णयाचे उल्लंघन केले, तर महिला काँग्रेसच्या वतीने अशा शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन ‘गांधीगिरी’ मार्गाने आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनांतर्गत नियम तोडणाऱ्या शाळा व्यवस्थापनाला गुलाब पुष्प देऊन त्यांच्या चुकीची आणि वाढत्या तापमानामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव करून दिली जाईल.
प्रशासन आणि पालकांना सतर्कतेचे आवाहन
जिल्हा प्रशासनाने आणि शिक्षण विभागाने या निर्देशांची अंमलबजावणी होत आहे की नाही, यावर कडक लक्ष ठेवावे, अशी मागणीही धानोरकर यांनी केली आहे. तसेच, पालकांनी देखील आपल्या पाल्यांच्या सुरक्षिततेसाठी सतर्क राहावे. जर कोणतीही खाजगी शाळा या आदेशाचे उल्लंघन करत असल्याचे आढळल्यास, त्याबाबतची माहिती तात्काळ प्रशासनास किंवा खासदार कार्यालयास द्यावी, असे आवाहन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले आहे.


