वरोरा शहरातील धक्कादायक घटना
स्लॅबवरून पडल्याचा रचला होता बनाव
पोलिसांनी काही तासांतच आरोपी मुलाला ठोकल्या बेड्या
वरोरा : शेती आणि पैशांच्या किरकोळ वादातून एका पोटच्या मुलानेच आपल्या जन्मदात्या पित्याची धारदार शस्त्राने हत्या केल्याची खळबळजनक घटना वरोरा शहरात घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि. २८) मेहता हॉल जवळील ‘चीरघर’ प्लॉट परिसरात उघडकीस आली. नामदेव जीवतोडे (५५) असे मृताचे नाव असून, पोलिसांनी आरोपी मुलगा पियुष उर्फ गोलू जीवतोडे याला अटक केली आहे.
. मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव जीवतोडे आणि गोलू यांच्यात मागील काही दिवसांपासून शेती आणि पैशांच्या व्यवहारावरून सतत वाद होत होते. मंगळवारी या वादाने रौद्र रूप धारण केले. रागाच्या भरात गोलूने वडिलांवर धारदार शस्त्राने सपासप वार केले, ज्यामध्ये नामदेव गंभीर जखमी झाले.
. विशेष म्हणजे, हत्या केल्यानंतर स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी गोलूने ‘वडील स्लॅबवरून खाली पडले’ असा बनाव रचला होता. मात्र, जखमांचे स्वरूप पाहून पोलिसांना संशय आला. गंभीर जखमी नामदेव यांना चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
. मृतकाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून वरोरा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास केला. पोलिसांच्या चौकशीत आरोपीचा बनाव उघड झाला आणि अवघ्या काही तासांतच गोलू जीवतोडे याला ताब्यात घेण्यात आले. या हृदयद्रावक घटनेमुळे वरोरा परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. वरोरा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


