नगर परिषदेवर धडकले संतप्त नागरिका
नियमित पाणीपुरवठा करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा
उपमुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन
भद्रावती : शहरात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. कडक उन्हाच्या झळांसोबतच आता पाणीटंचाईचे चटके बसू लागल्याने, आज संतप्त नागरिकांनी नगर परिषद गाठले. “शहराचा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा यावेळी उपमुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला.
. भद्रावती शहराच्या अनेक प्रभागांमध्ये सध्या पाणीटंचाईने रौद्र रूप धारण केले आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे आपल्या व्यथा मांडताना सांगितले की, पाणी पुरवठ्याच्या वेळा निश्चित नसल्यामुळे नोकरदार वर्ग आणि गृहिणींचे मोठे हाल होत आहेत. काही प्रभागांमध्ये तर दोन-दोन दिवस पाणी येत नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
प्रशासनाला निर्वाणीचा इशारा
आज दुपारी नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने नगर परिषद कार्यालयात धडक देऊन उपमुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “केवळ आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष पाणी द्या,” अशी मागणी यावेळी करण्यात आली.
. निवेदन देताना माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर (भाजपा), शहर महामंत्री प्रशांत डाखरे, माजी नगराध्यक्ष संजय वासेकर, किशोर गोवारदीपे, अण्णाजी कुटेमाटे, विशाल ठेंगणे, संदीप कुमरे, प्रशांत झाडे, राकेश खुसपुरे, डॉ. रतन बाला यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

