Home सामाजिक नागरिकांना अधिसूचित सेवा विहित वेळेत द्या

नागरिकांना अधिसूचित सेवा विहित वेळेत द्या

12

जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे प्रशासनाला कडक निर्देश

चंद्रपुरात ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा

३४ विभागांच्या १२१२ सेवा आता ऑनलाईन

कार्यालयांत माहिती फलक लावणे अनिवार्य

चंद्रपूर : महाराष्ट्र हे देशातील एक प्रगतशील राज्य म्हणून ओळखले जाते. लोकशाही आणि कल्याणकारी राज्यामध्ये नागरिकांना शासनाच्या विविध सेवा वेळेत मिळणे, हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे प्रशासनातील सर्व विभागांनी आपापल्या विभागाच्या अधिसूचित सेवा नागरिकांना विहित वेळेतच पुरवाव्यात; यामध्ये कोणत्याही प्रकारचा विलंब खपवून घेतला जाणार नाही, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिल्या.

.      जिल्हा प्रशासनाच्या वतीने २८ एप्रिल रोजी नियोजन सभागृह येथे आयोजित ‘सेवा हक्क दिन’ कार्यक्रमात त्या मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रशासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी तत्परता हवी
उपस्थितांना संबोधित करताना जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या की, शासन आणि प्रशासन पूर्णतः जनतेसाठी काम करते. नागरिकांना छोट्या कामांसाठी शासकीय कार्यालयांच्या वारंवार चकरा माराव्या लागू नयेत, यासाठी जास्तीत जास्त सेवा आता ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे कार्यालयीन कामकाजाचा ताण कमी झाला असला, तरी संबंधित अधिकाऱ्यांनी ऑनलाईन प्राप्त तक्रारी आणि अर्ज वेळेत निकाली काढणे बंधनकारक आहे. शासन स्तरावरून दरमहा जिल्ह्यांच्या कामगिरीचा (रँकिंग) आढावा घेतला जातो. अर्ज निकाली काढण्याच्या गतीवरून जिल्ह्याची प्रगती मोजली जाते. लोकांना विनासायास सेवा मिळाल्यास शासन-प्रशासनाची प्रतिमा उंचावण्यास मदत होते, असेही त्यांनी नमूद केले.

पारदर्शकतेसाठी कार्यालयात फलक लावण्याचे निर्देश
निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी आपल्या प्रास्ताविकात जिल्ह्यातील सेवांची सांख्यिकी माहिती दिली. सद्यस्थितीत ३४ विभागांच्या एकूण १२१२ सेवा ऑनलाईन असून १३ विभागांच्या ११३ सेवा ऑफलाईन आहेत. प्रत्येक शासकीय कार्यालयाने आपल्या दर्शनी भागात अधिसूचित सेवांचा माहिती फलक लावणे आवश्यक आहे. तसेच, जर तक्रार निवारण झाले नाही, तर प्रथम अपिलीय आणि द्वितीय अपिलीय अधिकारी कोण आहेत, याची माहिती सर्वसामान्य नागरिकांच्या माहितीसाठी फलकावर लावावी, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

जिल्ह्याचा नावलौकिक वाढवण्याचे आवाहन
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर यांनी पूर्वीच्या ऑफलाईन पद्धतीची तुलना आजच्या आधुनिक ऑनलाईन पद्धतीशी केली. प्रत्येक विभागाने तंत्रज्ञानाचा वापर करून १०० टक्के काम पूर्ण करावे आणि जिल्ह्याचा नावलौकिक वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप
या कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यात लक्ष्मी झोडे, वैष्णवी गभणे व चंदा वैद्य यांना नवीन शिधापत्रिका (रेशन कार्ड), गोविंद सरकार यांना संजय गांधी निराधार योजनेचे प्रमाणपत्र, तर वर्षा कोडापे, प्रतीक्षा चावरे व शुभांगी चवरे यांना पोलीस विभागाचे व्हेरिफिकेशन प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले.

.        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा प्रकल्प प्रमुख विकास लालसरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!