पेपर मिल बुद्ध पौर्णिमा समारोह समितीचे आयोजन
पूर्व विदर्भात पहिल्यांदाच भव्य खुल्या रंगमंचावर होणार प्रयोग
बल्लारपूर : येथील जागतिक स्तरावरील पेपर मिल उद्योग समूहातील बुद्ध पौर्णिमा समारोह समितीच्या वतीने, तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, १ मे रोजी सायंकाळी ७ वाजता पेपर मिल येथील कलामंदिर परिसरातील खुल्या रंगमंचावर ‘धम्मचक्र’ या महानाट्याचा प्रयोग सादर केला जाणार आहे.
. नागपूर येथील ‘कृती थिएटर अँड स्पोर्ट्स अकादमी’च्या तब्बल ६० नाट्य कलावंतांच्या सहभागातून हे महानाट्य साकारणार आहे. हिंदी भाषेत होणाऱ्या या प्रयोगातून तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या काळापासून ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन संघर्षापर्यंतचा गौरवशाली इतिहास प्रेक्षकांना प्रत्यक्ष अनुभवता येईल. पूर्व विदर्भात पहिल्यांदाच अशा स्वरूपाचे महानाट्य होत असल्याने नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
. या विशेष कार्यक्रमासाठी ५६×३६ फूट आकाराचा आणि ८ फूट उंच असा भव्य रंगमंच उभारला जाणार असून, लेझर विद्युत रोषणाई आणि दर्जेदार ध्वनिव्यवस्था हे या प्रयोगाचे मुख्य आकर्षण असेल. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.
प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती
या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक राजेश गायकवाड (चंद्रपूर), बीजीपीपीएलचे महाव्यवस्थापक उदय कुकडे (बल्लारपूर), महाव्यवस्थापक (मानव संसाधन) प्रवीण शंकर आणि पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे उपस्थित राहणार आहेत.
. या महानाट्याच्या यशस्वीतेसाठी बुद्ध पौर्णिमा जयंती समारोह समितीचे अतुल शेंडे, आकाशकांत दुर्गे, महेंद्र रामटेके, निळकंठ पाटील, विकास जयकर, मंगलदीप हस्ते, प्रितम उमरे, राजकुमार सोनारकर, राजेश गावंडे, सुमेध शेंडे, विकास पेटकर व अन्य पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.


