मप्रनि मंडळाच्या ‘सुस्त’ अधिकाऱ्यांवर खासदार आणि जिल्हाधिकारी संतापले !
माउंट कार्मेल स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या ‘एसीसी’ कंपनीच्या कोळसा डम्पिंग यार्डवर हातोडा पडणार ?
उद्यापर्यंत अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे कठोर फर्मान
चंद्रपूर : घुग्घुस येथील माउंट कार्मेल स्कूलमधील २५०० निष्पाप विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी एसीसी (ACC) कंपनीच्या कोल डम्पिंग यार्डद्वारे खेळला जाणारा जीवघेणा खेळ आता चव्हाट्यावर आला आहे. शाळेला अगदी लागून असलेल्या या यार्डमधून उडणारी विषारी कोळशाची धूळ चिमुकल्यांच्या फुफ्फुसांत घर करत असून, त्यांचे भविष्य धूसर होत आहे. या गंभीर प्रश्नावर प्रशासकीय दिरंगाई आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) संवेदनाहीन कारभारामुळे जनक्षोभाचा ज्वालामुखी उसळला आहे.
प्रशासनाचा ‘कागदी घोडे’ नाचवण्याचा प्रकार
धक्कादायक बाब म्हणजे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०२४ मध्ये नोटीस बजावूनही तब्बल तीन वर्षे यावर कोणतीही ठोस कारवाई केली नाही. प्रशासनाच्या या ढिम्म वृत्तीमुळे हजारो विद्यार्थ्यांचे आरोग्य टांगणीला लागले आहे. गेल्या तीन वर्षांपासून मप्रनि मंडळ केवळ कागदोपत्री नोटिसांचा खेळ खेळण्यात मग्न असून, हे प्रशासन कोळसा माफियांना अभय देऊन विद्यार्थ्यांच्या जीवाचा सौदा करत आहे का? असा बोचरा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.
बेजबाबदार अधिकाऱ्याला कडक ताकीद
या संदर्भात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यादव यांचा अत्यंत बेजबाबदार चेहरा समोर आला. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना तातडीने प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून कारवाईचे निर्देश दिले असता, “पुढच्या आठवड्यात बघतो,” असे उत्तर यादव यांनी दिले. अवघ्या १५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या घुग्घुसमध्ये जाण्यासाठी आठवड्याची मुदत मागणाऱ्या या अधिकाऱ्याच्या हेतूवर खासदार प्रतिभा धानोरकर आणि जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना तात्काळ कडक ताकीद देत ‘उद्याच्या उद्या’ (गुरुवारी) घटनास्थळी भेट देऊन अहवाल सादर करण्याचे कठोर फर्मान सोडले आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर यांचा लोकआंदोलनाचा इशारा
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी याप्रकरणी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. “भविष्यातील पिढीच्या आरोग्यापेक्षा कोल डम्पिंग यार्डचे हित जोपासणाऱ्या अधिकाऱ्यांची कार्यपद्धती खपवून घेतली जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. जर उद्यापर्यंत या प्रदूषणावर ठोस कारवाईचा अहवाल प्राप्त झाला नाही, तर तीव्र लोकआंदोलन छेडले जाईल, अशी गर्जना त्यांनी केली आहे.
. आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष उद्या होणाऱ्या पाहणीकडे आणि प्रशासनाच्या कारवाईकडे लागले आहे. कोळसा डम्पिंग यार्डवर खरोखर हातोडा पडणार की चिमुकल्यांचा श्वास असाच कोंडला जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


