आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला विकासाचा महाआरखडा !
स्व. चांगुनाबाई मुनगंटीवार म्हाडा वसाहतीत फलक अनावरण
मोफत मॉडेल स्कूल, २३५ कोटींची घरे आणि आंतरराष्ट्रीय स्टेडियमची मोठी घोषणा
चंद्रपूर : चंद्रपूर शहराच्या विकासाला नवी दिशा देतानाच, कष्टकरी ऑटो चालक-मालक बांधवांच्या हक्कांसाठी विधानसभेत बुलंद आवाज उठवणारे लोकनेते आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शहराच्या सर्वांगीण प्रगतीचा ‘रोडमॅप’ सादर केला आहे. दाताळा येथील स्व. चांगुनाबाई सच्चिदानंद मुनगंटीवार म्हाडा वसाहतीतील फलकाचे अनावरण आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते अत्यंत भावनिक वातावरणात पार पडले. यावेळी त्यांनी केवळ मातोश्रींच्या स्मृतींना उजाळा दिला नाही, तर या परिसराचा चेहरामोहरा बदलणाऱ्या शेकडो कोटींच्या विकासकामांचा धडाका जाहीर केला.
ऑटो चालकांसाठी हक्काची घरे आणि ‘प्रोफेशनल टॅक्स’मुक्तीचा लढा
कार्यक्रमाला संबोधित करताना आ. मुनगंटीवार म्हणाले की, “जेव्हा जेव्हा ऑटो चालक बांधवांनी साद घातली, तेव्हा मी भावाच्या नात्याने त्यांच्या पाठीशी उभा राहिलो.” विधानसभेत प्रभावी संघर्ष करून ऑटो चालकांवरील व्यवसाय कर (Professional Tax) रद्द करण्यात त्यांनी यश मिळवले होते, तसेच २०१२ मध्ये जाचक वाहनकरही मागे घेण्यास सरकारला भाग पाडले होते. या लढाऊ वारशाची आठवण करून देताना त्यांनी सांगितले की, म्हाडामार्फत विशेष बाब म्हणून ऑटो चालकांसाठी १०० घरे अल्प दरात उपलब्ध करून दिली असून, आगामी काळात ही व्याप्ती अधिक वाढवण्यात येईल.
![]()
विद्यार्थ्यांसाठी फी-मुक्त ‘मॉडेल स्कूल’ आणि शैक्षणिक क्रांती
म्हाडा वसाहतीतील कुटुंबांसाठी सर्वात मोठी घोषणा करताना आ. मुनगंटीवार यांनी सांगितले की, येत्या दीड वर्षात येथे एक ‘अत्याधुनिक मॉडेल शाळा’ उभारली जाईल. या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे, ऑटो चालक आणि वसाहतीतील विद्यार्थ्यांकडून कोणतीही फी घेतली जाणार नाही. दर्जेदार आणि मोफत शिक्षण देऊन कामगारांची मुलेही अधिकारी आणि उद्योजक बनावीत, हे आपले स्वप्न असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
पायाभूत सुविधांसाठी ४०० कोटींहून अधिक निधीचा टप्पा
चंद्रपूरच्या नागरी विकासासाठी आ. मुनगंटीवार यांनी निधीचा ओघ सुरूच ठेवला आहे. म्हाडाच्या १० हजार घरांच्या महाप्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील २,००४ घरांना मंजुरी मिळाली असून, यासाठी २३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय, वसाहतीतील रस्ते विकासासाठी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारकडून १४७ कोटी रुपयांचा निधी खेचून आणल्याचे त्यांनी आनंदाने नमूद केले. या निधीतून म्हाडा परिसरात सिमेंट रस्ते, स्ट्रीट लाईट, पिण्याचे पाणी, ड्रेनेज, उद्याने आणि व्यायामशाळा (जिम) यांसारख्या जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण केल्या जातील.
आंतरराष्ट्रीय स्टेडियम आणि ‘नवीन चंद्रपूर’ची आधुनिक ओळख
चंद्रपूरला क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळवून देण्यासाठी वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाने १३७ कोटी रुपयांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारण्यात येत आहे. तसेच, ‘नवीन चंद्रपूर’ शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी’द्वारे (PMC) एक मास्टर प्लॅन तयार केला जात आहे. कोसारा येथे ५.५० कोटींच्या खर्चातून ई-लायब्ररी, ऑक्सिजन पार्क आणि वृद्धाश्रम उभारून प्रत्येक घटकाला दिलासा दिला जाणार आहे.
ऑटो चालक कल्याणकारी मंडळासाठी विधानसभेत पुन्हा आवाज
ऑटो चालकांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘कल्याणकारी मंडळा’ला अधिक बळकटी देण्याचा संकल्प त्यांनी सोडला. येत्या जून महिन्यातील विधानसभेच्या अधिवेशनात या मंडळाच्या सक्षमीकरणाचा मुद्दा आपण पुन्हा लावून धरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
भावूक क्षण: आईच्या नावे फलक अनावरण
स्व. चांगुनाबाई मुनगंटीवार यांच्या नावे फलकाचे अनावरण करताना आमदार मुनगंटीवार भावूक झाले होते. “आईचे नाव ही केवळ ओळख नसते, तर ती आयुष्यभर साथ देणारी शक्ती, संस्कारांची शिदोरी आणि प्रत्येक पावलावर प्रेरणा देणारी सावली असते,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या आईप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
मान्यवरांची उपस्थिती आणि सत्कार
या सोहळ्याला आशीर्वाद ऑटो चालक-मालक गृहनिर्माण सहकारी संस्थेचे अध्यक्ष बंडू आवारी, ऑटो चालक-मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर, जिल्हाध्यक्ष मधुकर राऊत, उपाध्यक्ष विनोद चन्ने, कोषाध्यक्ष किशोर वाटेकर, जिल्हा सचिव सुनील धंदरे, सरपंच विक्की लाडसे, अनिल डोंगरे तसेच संघटनेचे सदस्य जाकीर शेख, जहीर शेख, महेश ढेकरे, विश्वेश्वर राऊत, जनार्दन गुंजेकर, रवि आंबटकर, शंकर थोरात, अरविंद उमरे, विलास बावणे, अंकुश कौराते यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अखेरीस ऑटो चालक-मालक संघटनेच्या वतीने आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा शाल व श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.


