Home सामाजिक देशातील पहिल्या डिजिटल जनगणनेचा वाजला बिगुल

देशातील पहिल्या डिजिटल जनगणनेचा वाजला बिगुल

11

१ ते १५ मे पर्यंत ‘स्वयंगणना’ करण्याची सुवर्णसंधी !

चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला यंत्रणेचा आढावा

११ अंकी आयडी मिळवून नागरिकांनी राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याचे आवाहन

चंद्रपूर : सन २०११ च्या जनगणनेनंतर तब्बल १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज, १ मे २०२६ पासून देशातील पहिल्या डिजिटल जनगणनेला ऐतिहासिक सुरुवात होत आहे. या जनगणनेचे वैशिष्ट्य म्हणजे १ ते १५ मे या कालावधीत नागरिकांना ‘स्वयंगणना’ (Self-Enumeration) करण्याची विशेष सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी गुरुवारी सर्व प्रशासकीय यंत्रणेचा आढावा घेत या राष्ट्रीय कार्यात गांभीर्याने सहभागी होण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अशी आहे ‘स्वयंगणना’ करण्याची सोपी प्रक्रिया:
नागरिक घरबसल्या आपली माहिती ऑनलाईन नोंदवू शकतात. यासाठी सर्वप्रथम https://census.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपले राज्य निवडावे लागेल. त्यानंतर कुटुंब प्रमुखाचे नाव, १० अंकी मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी टाकून नोंदणी करावी लागेल. नोंदणी करताना पसंतीची भाषा निवडून मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी (OTP) प्रविष्ट करावा. एकदा भाषा निवडली की ती नंतर बदलता येणार नाही.

.       पुढील टप्प्यात आपल्या जिल्ह्याचा आणि गावाचा/शहराचा तपशील भरून नकाशावर (Map) आपल्या घराचे अचूक स्थान ‘लाल मार्कर’ ड्रॅग करून निश्चित करायचे आहे. त्यानंतर प्रश्नावलीमधील घरसुची आणि गृह गणनेची माहिती पूर्ण भरावी. माहिती भरून झाल्यावर ‘पूर्वावलोकन’ (Preview) करून सर्व डेटा तपासून घ्यावा आणि त्रुटी नसल्यास ‘सबमिट’ करावे.

११ अंकी आयडी आहे महत्त्वाचा:
अंतिम सबमिशन केल्यानंतर नागरिकांना ११ अंकी ‘एस.ई. आयडी’ (SE ID) एसएमएस किंवा ईमेलद्वारे प्राप्त होईल. जेव्हा जनगणना प्रगणक (Enumerator) तुमच्या घरी येतील, तेव्हा त्यांना फक्त हा आयडी दाखवायचा आहे. जर तुमचा आयडी त्यांच्याकडील नोंदीशी जुळला, तर तुमची माहिती थेट ग्राह्य धरली जाईल, अन्यथा गणक नव्याने डेटा गोळा करतील.

जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष सूचना
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत वसुमना पंत यांनी स्पष्ट केले की, जनगणना हे राष्ट्रीय कार्य असून यात लोकप्रतिनिधींनी स्वतःची गणना करून आदर्श निर्माण करावा. “नागरिकांनी दिलेली माहिती पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल. त्यामुळे सर्वांनी अचूक माहिती भरून १५ मे नंतर घरी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करावे,” असे आवाहन त्यांनी केले आहे.

.        या बैठकीला मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, पालिका प्रशासन अधिकारी डॉ. विद्या गायकवाड, तहसीलदार विजय पवार, प्रभारी नियोजन अधिकारी सुभाष कुमरे यांच्यासह दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!