५ दिवस चालणाऱ्या शिबिरात कला, संगीत आणि कौशल्य विकासाचे मिळणार धडे
पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
भद्रावती : तालुक्यातील पीएमश्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, चंदनखेडा येथे आज, २ मे पासून ‘बालसंस्कार उन्हाळी व्यक्तिमत्व शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे. ६ मे पर्यंत चालणाऱ्या या पाच दिवसीय शिबिराचे उद्घाटन आज मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले.
. कार्यक्रमाचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल कोकुडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस पाटील समीरखान पठाण, माजी सरपंच तथा प्रशासक नयन जांभूळे, अयुबखा पठाण, प्रमोद राखुंडे, राजेश गायकवाड, प्रभारी मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकवृंद प्रामुख्याने उपस्थित होते.
विविध विषयांचे मिळणार प्रशिक्षण
या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पाचही दिवस विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये मूल्यशिक्षण, संगीत, कला कार्यानुभव, संगणक प्रशिक्षण, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा, अक्षर सुधारणे तसेच विविध मनोरंजनात्मक खेळांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना पारंपरिक बाराबलुतेदार व्यवसायातील कौशल्य विकासाबाबतही मार्गदर्शन दिले जाणार आहे.
तज्ज्ञ मार्गदर्शकांची उपस्थिती
शिबिराच्या पहिल्या दिवशी संगीत मार्गदर्शक म्हणून स्वप्नील वानखेडे, योगाभ्यासासाठी प्रणय आगबत्तनवार, कराटे व लाठीकाठी प्रशिक्षिका दामिनी सूर्यवंशी आणि चित्रकला प्रशिक्षक पांडुरंग गायकवाड यांनी उपस्थित राहून शिबिरार्थींना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुखदेव मेश्राम यांनी केले, तर उपस्थितांचे आभार कविता हनवते यांनी मानले. या उद्घाटन सोहळ्याला मोठ्या संख्येने शिबिरार्थी, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. शाळेने घेतलेल्या या कौतुकास्पद पुढाकारामुळे परिसरात या उपक्रमाची जोरदार चर्चा असून सर्वत्र कौतुक केले जात आहे.


