Home चंद्रपुर जिल्हा विशेष वरोरा बाजार समितीत वजनात ४८ किलोची तफावत

वरोरा बाजार समितीत वजनात ४८ किलोची तफावत

65

संतप्त शेतकऱ्यांचे गेटवर आंदोलन

प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड

सुरक्षा रक्षकानेच केले वजन

दोषींवर कारवाईची मागणी

वरोरा : रात्रंदिवस घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाची बाजार समितीतच लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत समोर आला आहे. एका शेतकऱ्याच्या शेतमालाच्या वजनात तब्बल ४८ किलोची तफावत आढळल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या मांडून जोरदार आंदोलन केले.

नेमकी घटना काय ?
चिकणी येथील एक शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास बाजार समितीत घेऊन आला होता. नियमानुसार अधिकृत काट्यावर बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी वजन करणे अपेक्षित होते, मात्र यावेळी एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. अखेर तेथील सुरक्षा रक्षकानेच वजन केले. या वजनात शेतमाल १ क्विंटल ९० किलो (१९० किलो) भरला.

असा फुटला भांडाफोड:
सुरक्षा रक्षकाने केलेल्या वजनावर शेतकऱ्याला शंका आली. त्याने तत्काळ जवळच असलेल्या एका खासगी व्यापाऱ्याच्या काट्यावर पुन्हा वजन केले. धक्कादायक बाब म्हणजे, तिथे तेच वजन २ क्विंटल ३८ किलो (२३८ किलो) भरले. अधिकृत वजन आणि खासगी वजन यात तब्बल ४८ किलोचा फरक आढळल्याने शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

शेतकऱ्यांचा संताप आणि मागणी
हा प्रकार समजताच इतर शेतकरीही आक्रमक झाले. शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या गेटवर जमा होऊन प्रशासनाच्या विरोधात निदर्शने केली. “शेतकरी आधीच निसर्ग आणि वन्यप्राण्यांच्या त्रासाने खचला आहे, त्यात बाजार समितीत अशी उघड लूट होत असेल तर न्याय कुणाकडे मागायचा ?” असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
वजनात तफावत आढळल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अधिकृत काट्यावर कायमस्वरूपी जबाबदार कर्मचाऱ्यांची उपस्थिती सुनिश्चित करावी, बाजार समितीच्या कारभारात पारदर्शकता आणावी, अश्या प्रमुख मागण्या होत्या.

या घटनेमुळे वरोरा बाजार समितीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाने यावर काय पावले उचलली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!