प्रवासी सोयी-सुविधांनी अद्यावत असणाऱ्या बस स्थानकांना मिळणार ‘पुरस्कार‘
भद्रावती : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत आज, ६ एप्रिल रोजी भद्रावती बस स्थानकाची पाहणी करण्यात आली. पुणे प्रदेशाच्या प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर आणि प्रादेशिक अभियंता आर. कांबळे यांच्या चमूने या स्थानकास भेट देऊन प्रवासी सुविधांचा आढावा घेतला. या सर्वेक्षणात गुणांकनानुसार अव्वल ठरणारी बस स्थानके पुरस्कृत केली जाणार आहेत.
विविध निकषांवर आधारित मूल्यमापन
या सर्वेक्षणादरम्यान बस स्थानकाचा परिसर, स्वच्छता, पाणी व वीज व्यवस्था, प्रवासी निवारा, शौचालय व मूत्रघरे, बागेचे सुशोभीकरण, कर्मचाऱ्यांचा गणवेश, उपहारगृह, वाहनतळ आणि कर्मचाऱ्यांची प्रवाशांप्रती असलेली सौजन्यशीलता अशा विविध मुद्द्यांवर आधारित प्रश्नावली भरण्यात आली. यावेळी उपस्थित स्थानिक पत्रकार दिलीप मांढरे, प्रा. विवेक सरपटवार आणि प्रा. लिमेश माणूसमारे यांनी दिलेल्या गुणांकनानुसार हे मूल्यमापन पार पडले.
समस्या मांडल्या, अद्यावत करण्याची मागणी
पाहणी दरम्यान पत्रकारांनी भद्रावती बस स्थानकास भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे प्रादेशिक व्यवस्थापकांचे लक्ष वेधले. स्थानक अद्यावत करण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या. यावर सकारात्मक प्रतिसाद देत, ताम्हणकर यांनी या समस्यांची नोंद घेऊन वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
स्वच्छतेत सातत्य हवे : प्रवाशांची भावना
विशेष म्हणजे, सर्वेक्षणाच्या निमित्ताने बस स्थानक परिसर अत्यंत सुंदर आणि स्वच्छ करण्यात आला होता. कर्मचारीही खाकी गणवेशात तत्पर दिसून आले. मात्र, ही स्वच्छता आणि तत्परता केवळ सर्वेक्षणापुरती मर्यादित न राहता त्यात कायमस्वरूपी सातत्य असावे, अशी रास्त अपेक्षा उपस्थित प्रवाशांनी व्यक्त केली.
. याप्रसंगी चंद्रपूर आगार व्यवस्थापक पुण्यवर्धन वर्धेकर, वाहतूक निरीक्षक उत्कर्षा चौधरी, वाहतूक नियंत्रक शेषराव कडाम, प्रवासी मित्र मो. रफिक मो. शेख, रुपाली ऐबट, प्रदीप रंगारी, नीता आत्राम व इतर कर्मचारी उपस्थित होते.


