Home चंद्रपुर जिल्हा विशेष इस्रायल-इराण युद्धाचा फटका

इस्रायल-इराण युद्धाचा फटका

152

इंधन टंचाईमुळे बळीराजा संकटात

पेट्रोल-डिझेलसह गॅससाठी नागरिकांची धावपळ

मालू पेट्रोल पंपावर ग्राहकांची मोठी गर्दी

वरोरा : इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम आता ग्रामीण भागातील जनजीवनावर होऊ लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या पेचामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला असून, वरोरा शहरासह ग्रामीण भागात पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा जाणवत आहे. ऐन शेतीच्या हंगामात डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली असून पीक काढणीची कामे खोळंबली आहेत.

वरोरा तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपांवरील साठा संपल्याने वाहनधारकांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे. मात्र, चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील मालू पेट्रोल पंपावर इंधन उपलब्ध असल्याने नागरिकांनी तेथे मोठी गर्दी केली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संचालक प्रणेश मालू यांनी संयम राखण्याचे आवाहन करत, सर्वांना पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही दिली. दुसरीकडे, गॅस एजन्सीवरही सिलिंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

इंधन आणि गॅसच्या या तुटवड्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले असून, वाहतूक व्यवस्थेवरही याचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही टंचाई किती दिवस राहणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. प्रशासनाने यावर तत्काळ तोडगा काढून इंधन पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकरी व नागरिकांकडून केली जात आहे.

टेमूर्डा परिसरात शेतीकामे ठप्प
टेमूर्डा हे नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील महत्त्वाचे केंद्र असून, परिसरातील २५ ते ३० गावांतील नागरिक बाजारपेठ, बँक आणि इंधनासाठी येथे येतात. सध्या शेतीचा हंगाम जोमात असतानाच डिझेलची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. ट्रॅक्टर चालकांना डिझेल मिळत नसल्याने शेतीची मशागत आणि पीक काढणीची कामे थांबली आहेत. डिझेलअभावी ट्रॅक्टर उभे असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, त्यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

error: Content is protected !!