Home सामाजिक झरपट नदीच्या पुनरुज्जीवनासाठी आ. मुनगंटीवार यांची विधानसभेत जोरदार मागणी

झरपट नदीच्या पुनरुज्जीवनासाठी आ. मुनगंटीवार यांची विधानसभेत जोरदार मागणी

155

नागरिकांचा विनंती अर्ज सभागृहात सादर

विधानसभा अध्यक्षांकडून चौकशीसाठी ‘विनंती अर्ज समिती’कडे वर्ग

चंद्रपूर : चंद्रपूर शहराच्या पर्यावरणीय, धार्मिक व ऐतिहासिक अस्मितेशी निगडित असलेल्या झरपट नदीच्या पुनरुज्जीवनाचा प्रश्न आज विधानसभेत प्रभावीपणे दुमदुमला. शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या या नदीची दयनीय अवस्था दूर करण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरच्या नागरिकांच्या वतीने एक महत्त्वपूर्ण विनंती अर्ज विधानसभा सभागृहात अधिकृतरित्या मांडला. विधानसभा अध्यक्षांनी या अर्जाचे गांभीर्य लक्षात घेऊन तो पुढील चौकशी व आवश्यक कार्यवाहीसाठी ‘विधानसभा विनंती अर्ज समिती’कडे पाठविण्याचे जाहीर केले आहे.

नदीचे अस्तित्व आणि पर्यावरणीय संकट
चंद्रपूर ही ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरेची समृद्ध नगरी असून झरपट नदी शहराच्या वैभवाचा कणा आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून नदीपात्र अरुंद होणे, मोठ्या प्रमाणात गाळ साचणे, वाढती अतिक्रमणे आणि सांडपाणी व कचऱ्यामुळे होणारे प्रदूषण यांमुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. यामुळे शहराचा पर्यावरणीय समतोल बिघडत असून पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोकाही वाढला आहे. नदीचे पुनरुज्जीवन झाल्यास भूजल पातळी वाढण्यास आणि नागरिकांना स्वच्छ आरोग्यदायी वातावरण मिळण्यास मदत होईल, असे मुनगंटीवार यांनी नमूद केले.

धार्मिक स्थळांचे पावित्र्य आणि पर्यटन
झरपट नदीच्या तीरावर वसलेली श्री अंचलेश्वर मंदिर व श्री महाकाली मंदिर ही चंद्रपूरकरांची मुख्य श्रद्धास्थाने आहेत. दरवर्षी येथे लाखो भाविक येतात, मात्र नदीच्या प्रदूषित स्थितीमुळे या पवित्र स्थळांचे पावित्र्य बाधित होत आहे. यामुळे भाविकांच्या भावना दुखावत असून धार्मिक पर्यटनावरही विपरीत परिणाम होत आहे. नदी स्वच्छ झाल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडून पर्यटनाला मोठी चालना मिळेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

संसदीय आयुधांचा प्रभावी वापर
या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वीही तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न आणि कपात सूचना यांसारख्या संसदीय आयुधांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले होते. मात्र, प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही न झाल्याने त्यांनी अखेर विधानसभा कामकाजातील अत्यंत प्रभावी मानल्या जाणाऱ्या ‘विनंती अर्ज समिती’कडे दाद मागितली आहे.

ईरई पाठोपाठ आता झरपटचाही मार्ग सुकर
विशेष म्हणजे, यापूर्वी आ. मुनगंटीवार यांनी ईरई नदीच्या पुनरुज्जीवनाचा प्रश्नही विधानसभा विनंती अर्ज समितीकडे सादर केला आहे. आता झरपट नदीचा विषयही समितीकडे गेल्याने चंद्रपूर शहरातील दोन्ही प्रमुख नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा मार्ग सुकर व सुलभ झाला आहे. चंद्रपूरच्या ऐतिहासिक वैभवाचे जतन आणि भावी पिढ्यांसाठी स्वच्छ पर्यावरणाची निर्मिती करण्याच्या दृष्टीने हे पाऊल अत्यंत जिव्हाळ्याचे मानले जात आहे.

error: Content is protected !!