प्रशासकीय समिती आक्रमक
नियुक्ती रद्द करण्याची मागणी
वरोरा : तालुक्यातील ग्रामपंचायत चिनोरा येथील प्रशासकांच्या मनमानी कारभारामुळे गावातील विकासकामे रखडली असल्याचा गंभीर आरोप चिनोरा येथील प्रशासकीय समितीने केला आहे. यासंदर्भात गटविकास अधिकारी, पंचायत समिती वरोरा यांच्याकडे लेखी तक्रार देऊन प्रशासकांची नियुक्ती तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नेमके प्रकरण काय ?
चिनोरा येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (रोहयो) पेव्हर ब्लॉक आणि सिमेंट काँक्रीट रोडचे काम मागील ५ महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले आहे. ग्रामपंचायतीने या कामाची वर्क ऑर्डरही दिली असून ग्रामसेवकांनी संबंधित फाईलवर स्वाक्षरी केली आहे. मात्र, या कामाचे ‘काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र’ (Completion Certificate) देण्यासाठी प्रशासक परचाके या जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
गाव विकासात अडथळा
प्रशासकांच्या या वर्तणुकीमुळे गावच्या विकासात अडथळा निर्माण होत असून, ही बाब ग्रामविकासाच्या दृष्टीने घातक असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
. आता या प्रकरणी गटविकास अधिकारी काय पाऊल उचलतात आणि संबंधित प्रशासकावर चौकशी होऊन कारवाई होते का, याकडे संपूर्ण चिनोरावासीयांचे लक्ष लागले आहे.


