Home सामाजिक ‘चांदा ज्योती सुपर १००’ उपक्रमांतर्गत अंतिम निवड परीक्षा २३ मार्च रोजी

‘चांदा ज्योती सुपर १००’ उपक्रमांतर्गत अंतिम निवड परीक्षा २३ मार्च रोजी

199

चंद्रपूर जिल्हा परिषदेचा उपक्रम

पात्र विद्यार्थ्यांना मिळणार मोफत IIT-JEE/NEET चे मार्गदर्शन

चंद्रपूर : ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व जमातीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘चांदा ज्योती सुपर १००’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत अंतिम निवड परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा २३ मार्च २०२६ रोजी दुपारी १२ ते २.३० या वेळेत भवानजीभाई चव्हाण हायस्कूल, मूल रोड, चंद्रपूर येथे संपन्न होणार आहे.

.     सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वीत शिकणाऱ्या अनुसूचित जाती व जमातीतील (SC/ST) विद्यार्थ्यांना या उपक्रमांतर्गत दोन वर्षे मोफत निवासी मार्गदर्शन दिले जाते. IIT, JEE आणि NEET सारख्या कठीण स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेऊन विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.

प्रथम चाळणी परीक्षेचा निकाल जाहीर
या उपक्रमासाठी पहिली चाळणी परीक्षा ३१ जानेवारी २०२६ रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम परीक्षेत ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत, ते सर्व विद्यार्थी आता २३ मार्च रोजी होणाऱ्या अंतिम परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.

१० वीच्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा
अंतिम निवड परीक्षेची प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांत उपलब्ध असेल. या परीक्षेमध्ये प्रामुख्याने इयत्ता १० वीच्या बीजगणित (Algebra), भूमिती (Geometry) आणि विज्ञान (Science) या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत.

.     ग्रामीण भागातील पात्र विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

error: Content is protected !!