खासदार प्रतिभा धानोरकर यांचा प्रशासनाला सज्जड इशारा
कोंढाळा-येन्सा पुनर्वसनाचा प्रश्न पेटला
चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील कोंढाळा-येन्सा येथील ग्रामस्थांच्या प्रलंबित मागण्या आणि ‘श्री सिमेंट’ कंपनीच्या मनमानी कारभारावरून खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “लोकशाहीत ग्रामसभेचा निर्णय सर्वोच्च असतो, त्याचा अवमान खपवून घेणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाला ठणकावले. वरोरा उपविभागीय अधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत त्यांनी कंपनी प्रशासनाला ग्रामस्थांवर सूडबुद्धीने केलेले खोटे गुन्हे मागे घेण्याचा इशारा दिला.
स्थानिक भूमिपुत्रांनाच नोकरीत प्राधान्य द्या
या बैठकीत कोंढाळा गावाचे पूर्ण पुनर्वसन आणि स्थानिक सुशिक्षित तरुणांच्या रोजगाराचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित करण्यात आला. कंपनीने बाहेरील कंत्राटी कामगारांऐवजी जमिनी देणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत अनिवार्यपणे प्राधान्य द्यावे, अशा सूचना धानोरकर यांनी दिल्या. जमिनी देऊनही तरुण रोजगारासाठी भटकत असतील, तर ते अन्यायकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खोट्या गुन्ह्यांविरुद्ध आंदोलनाचा इशारा
हक्कासाठी लढा देणाऱ्या निष्पाप ग्रामस्थांवर कंपनीने दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी खासदारांनी केली. या प्रकरणाची पारदर्शक चौकशी न झाल्यास जनतेसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
. या बैठकीला उपविभागीय अधिकारी संदीप मस्के, तहसीलदार योगेश कौटकर, गटविकास अधिकारी गजानन मुंडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.


