खदान मालकांच्या मनमानीमुळे हजारो ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात !
नंदोरी, विसलोनचा पाणी पुरवठा धोक्यात
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील नंदोरी परिसरातून वाहणाऱ्या ‘शीर’ नदीच्या पात्राने आता चक्क हिरवा रंग धारण केला आहे. परिसरातील गिट्टी खदान मालकांनी आपल्या फायद्यासाठी खदानीतील दूषित आणि सडलेले ‘चिल्ला’ पाणी थेट नदीपात्रात सोडल्याने ही भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर प्रकारामुळे परिसरातील हजारो नागरिक आता मृत्यूच्या छायेखाली वावरत असून, प्रशासकीय यंत्रणेच्या डोळेझाकपणाविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे.
खदान मालकांचा नफेखोरपणा आणि निसर्गाचा ऱ्हास
नंदोरी खुर्द परिसरात गिट्टी खदानींचे मोठे जाळे असून, अनेक खदान मालकांनी नियमांची पायमल्ली करत क्षमतेपेक्षा जास्त उत्खनन केले आहे. रिकाम्या झालेल्या खदानींमध्ये वरोरा औद्योगिक वसाहतीतील ‘जीएमआर’ आणि ‘वर्धा पॉवर’ कंपन्यांची घातक राख (Fly Ash) टाकून त्या बुजवण्यात आल्या. मात्र, ज्या खदानी अजूनही खुल्या आहेत, त्यामध्ये पावसाचे पाणी साचून ते सडले आहे. आता या खदानींच्या तळाशी असलेला गोटा काढण्यासाठी मालकांनी हे विषारी पाणी उपसा करून कोणतीही प्रक्रिया न करता थेट शीर नदीत सोडण्याचा सपाटा लावला आहे.
नदीवर प्रदूषणाची ‘हिरवी चादर’
नदीच्या पात्राकडे पाहिल्यास त्यावर पूर्णपणे हिरवी चादर चढल्याचा भास होतो. हे केवळ शेवाळ नसून साचलेले विषारी पाणी आहे. धक्कादायक बाब म्हणजे, याच नदीतून नंदोरी आणि विसलोन या दोन मोठ्या गावांच्या नळ योजना कार्यान्वित आहेत. हेच दूषित पाणी थेट घराघरांत पोहोचत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी क्रूर खेळ सुरू आहे.
आजारांचा विळखा : पोटाचे विकार आणि त्वचारोग वाढले
या दूषित पाण्यामुळे परिसरात पोटाचे विकार, जुलाब आणि त्वचारोगांसारख्या आजारांनी डोके वर काढले आहे. सुज्ञ नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, जर हे पाणी सोडणे तातडीने थांबवले नाही आणि नदीचे शुद्धीकरण झाले नाही, तर भविष्यात या गावांवर दुर्धर आजारांचे मोठे संकट ओढवू शकते.
प्रशासनाचे मौन की अभय ?
एकीकडे ‘शीर’ नदीचे अस्तित्व धोक्यात आले असताना, दुसरीकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक प्रशासन याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे. खदान मालकांच्या बेजबाबदार वृत्तीमुळे ग्रामस्थ मृत्यूच्या छायेखाली वावरत आहेत. दोषी खदान मालकांवर तातडीने कठोर फौजदारी कारवाई करावी आणि गावाचा पाणीपुरवठा सुरक्षित करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


