रेती माफियांमध्ये खळबळ
विनापरवाना वाहतूक करणाऱ्या ट्रकवर दंडात्मक कारवाई
भद्रावती : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून छुप्या मार्गाने सुरू असलेल्या अवैध रेती उपसा आणि वाहतुकीविरोधात महसूल विभागाने कंबर कसली आहे. रविवार, दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास केलेल्या एका धडक कारवाईत, विनापरवाना रेतीची वाहतूक करणारा ‘हायवा’ ट्रक महसूल पथकाने ताब्यात घेतला.
. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे महसूल कर्मचाऱ्यांचे एक विशेष पथक तैनात करण्यात आले होते. संशयास्पद रित्या वेगाने जाणाऱ्या हायवा ट्रक (क्र. MH 34 BZ 5865) ला पथकाने थांबवून तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर उपसा केलेली रेती आढळून आली. वाहन चालकाकडे रेती वाहतुकीचा कोणताही अधिकृत परवाना (रॉयल्टी पास) नसल्याचे स्पष्ट झाल्याने पथकाने तात्काळ वाहन जप्त करून तहसील कार्यालय, भद्रावती येथे जमा केले आहे.
. महसूल विभागाने अचानक केलेल्या या कारवाईमुळे रेती माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, ग्राम महसूल अधिकारी शुभम धात्रक आणि चालक बंडू वेलफुलवार यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. संबंधितांवर आता कडक दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.


