आरोग्य शिबिरात ८६ रुग्णांची तपासणी : २४ तरुणांचे रक्तदान
१७ मोतीबिंदू रुग्णांना मिळणार दृष्टी : समता फाउंडेशनचा पुढाकार
माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांची विशेष उपस्थिती
गुरुदेव सेवा मंडळ व छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयाद्वारे सामाजिक बांधिलकी
वरोरा : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे औचित्य साधून आसाळा येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. गुरुदेव सेवा मंडळ, आसाळा आणि छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय, सुर्ला (बोर्डा) यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित भव्य आरोग्य व रक्तदान शिबिरात शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवला.
. तालुक्यातील आसाळा येथे २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान पार पडलेल्या या सोहळ्यात ३० जानेवारी रोजी विशेष आरोग्य शिबिर घेण्यात आले. या प्रसंगी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिबिराला भेट देऊन आयोजकांच्या कार्याचे कौतुक केले. त्यांच्या उपस्थितीने ग्रामस्थ आणि स्वयंसेवकांचा उत्साह द्विगुणित झाला होता.
![]()
आरोग्य तपासणीला प्रतिसाद:
शिबिरामध्ये एकूण ८६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ५२ नागरिकांना आयुष्मान कार्डाचे वितरण करण्यात आले, तर ४२ जणांची सिकलसेल तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे, नेत्र तपासणीत १७ रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले असून, त्यांच्यावर १३ तारखेला समता फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
रक्तदान आणि इतर सेवा
अमन ब्लड बँक, नागपूर यांच्या सहकार्याने पार पडलेल्या रक्तदान मोहिमेत २४ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कर्तव्य पार पाडले. तसेच शिबिरात ५ नवीन उच्च रक्तदाब, ३ संशयित कुष्ठरुग्ण आणि ९ संशयित क्षयरुग्ण आढळून आले असून त्यांच्या पुढील उपचाराची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कोसळसार, उपकेंद्र भटाळा येथील कर्मचारी, ‘एनएसएस’चे (NSS) स्वयंसेवक आणि आसाळा ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.


