Home चंद्रपुर जिल्हा विशेष कर्तव्य बजावताना जखमी झालेले खेमजईचे सुपुत्र राहुल चौधरी शहीद

कर्तव्य बजावताना जखमी झालेले खेमजईचे सुपुत्र राहुल चौधरी शहीद

380

वरोरा तालुक्यावर शोककळा

पाटणा येथे २२ दिवसांपासून मृत्यूशी झुंज अपयशी

आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

वरोरा : देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना अपघातात गंभीर जखमी झालेले वरोरा तालुक्यातील खेमजई येथील वीर सुपुत्र राहुल गोवर्धन चौधरी (३१) यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. मंगळवार, २० जानेवारी रोजी बिहारमधील पाटणा येथील पारस हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. सशस्त्र सीमा बलात (SSB) कार्यरत असलेल्या या तरुण जवानाच्या निधनामुळे संपूर्ण वरोरा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

२२ दिवसांची झुंज संपली
राहुल चौधरी हे एसएसबीच्या ४० व्या बटालियनमध्ये पाटणा येथे तैनात होते. २९ डिसेंबर २०२५ रोजी ड्युटीवर असताना त्यांचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर गेल्या २२ दिवसांपासून अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते, मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. मंगळवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

देशसेवेचा वारसा
राहुल यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण खेमजई येथील राजीव गांधी विद्यालयात, तर उच्च शिक्षण वरोरा येथील आनंदनिकेतन महाविद्यालयात झाले होते. अत्यंत जिद्दीने ते सैन्यदलात भरती झाले होते. विशेष म्हणजे, त्यांचे मोठे भाऊ राजकुमार चौधरी हे देखील भारतीय नौदलात कार्यरत असून, चौधरी कुटुंबातील दोन सुपुत्रांनी देशसेवेसाठी स्वतःला समर्पित केले आहे.

आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शहीद जवान राहुल चौधरी यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगी, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव बुधवारी रात्री उशिरा त्यांच्या मूळ गावी खेमजई येथे पोहोचले. आज, गुरुवार २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या पार्थिवावर शासकीय आणि लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. एका उमद्या जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने खेमजईकडे रवाना झाले आहेत.

error: Content is protected !!