अध्यक्ष लहानू बावणे यांचे विरोधकांना खुले आव्हान
गैरप्रकार सिद्ध केल्यास गुन्हा दाखल करा
पार्किंगच्या वादातून बदनामीचा कट असल्याचा पत्रकार परिषदेत दावा
भद्रावती : “मी संस्थेत कोणताही गैरप्रकार केलेला नाही. माझ्यावरील आरोप कोणी सिद्ध करून दाखवले, तर खुशाल माझ्यावर गुन्हा दाखल करावा,” असे थेट आव्हान संताजी नगर गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष लहानू सखाराम बावणे यांनी दिले आहे. संस्थेच्या भूखंड विक्रीत अपहार झाल्याच्या आरोपांचे खंडन करण्यासाठी शास्त्रीनगर येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सर्व व्यवहार नियमानुसारच
शनिवारी एका पत्रकार परिषदेत बावणे यांनी अडीच कोटींचा भूखंड अवघ्या १५ हजारांत विकल्याचा आरोप झाला होता. यावर स्पष्टीकरण देताना बावणे म्हणाले की, संस्थेच्या सभासदांना नाममात्र दरात भूखंड देण्याचा ठराव आधीच झालेला होता. मुखत्यार पत्राच्या अधिकारांचा वापर करून आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे. माझे अधिकार काढून घेतल्याचा दावाही खोटा असून विरोधक जनतेची दिशाभूल करत आहेत.
पार्किंगच्या वादातून तक्रारी
प्लॉटधारक महेश लोणकर यांनी यावेळी माहिती दिली की, मोकळ्या जागेत वाहने उभी करण्यास मज्जाव केल्याने सुरेश मस्के, युगेश खोब्रागडे, हरी खोब्रागडे व विनोद कामडी यांनी हा कट रचला आहे. १५ जानेवारीला शासकीय मोजणी झाल्यावर अतिक्रमण हटवण्यास सांगितल्यानंतर या व्यक्तींनी मोजणीचे पोल उपटून फेकले आणि साहित्याची चोरी केली, असा आरोपही लोणकर यांनी केला.
कायदेशीर लढाईची तयारी
संस्थेच्या वतीने सर्व आरोप फेटाळण्यात आले असून कायदेशीर मार्गाने सत्य समोर आणण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला अध्यक्ष लहानू सखाराम बावणे यांच्यासह महेश विठ्ठलराव लोणकर, सुनील लहानूजी बावणे आणि निखिल सुनील बावणे उपस्थित होते.


