‘बहुजन मेडीकोज‘तर्फे गौरव
महानायिकांच्या संयुक्त जयंतीनिमित्त अभिनव उपक्रम
यशस्वी विद्यार्थ्यांना ‘संविधान प्रस्तावना‘ आणि ‘ग्रंथ‘ देऊन सन्मानित
चंद्रपूर : क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, मां फातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ या महानायिकांच्या विचारांचा जागर करण्यासाठी ‘बहुजन मेडीकोज असोसिएशन, चंद्रपूर’ तर्फे आयोजित खुल्या सामाजिक ज्ञान स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच पार पडला. या स्पर्धेत चिमूर येथील आचल नागदेवते हिने प्रथम क्रमांक पटकावून १०,००० रुपये रोख, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह आपल्या नावे केले.
वैचारिक साहित्यावर आधारित स्पर्धा
स्थानिक अग्रसेन भवन येथे रविवार, १८ जानेवारी २०२६ रोजी हा सोहळा संपन्न झाला. ही स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती’, प्रा. हरी नरके लिखित ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले’ आणि प्रा. अशोक राणा लिखित ‘स्वराज्य संकल्पिका राजमाता जिजाऊ’ या महत्त्वपूर्ण पुस्तकांवर आधारित होती. या स्पर्धेत पोंभुर्णा येथील प्रबुद्ध गोवर्धन याने द्वितीय (७,००० रु.), तर ग्रीष्मा गेडाम व सुरक्षा गोवर्धन यांनी तृतीय (५,००० रु.) क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील गुणवंत विजेते
विश्वजित तलांडे, छकुली कोटरंगे, श्रेया मिलमिले, मोहन मिलमिले, हेमंत कोयताडे, सचिन पिदुरकर, हर्षदा पिंगे, सुमेधा गोवर्धन, शितल भसारकर, परमानंद चौरे, करण माऊलीकर, अंकिता उराडे, लावण्या मेश्राम, गोविंद मुंडे, अभिनव दुर्गे, लुकेश चलाख, अमीषा अलोणे, किरण वैद्य, ज्ञानेश्वर बुरीवार आणि आशिष गायकवाड.
संविधानाच्या मूल्यांचा जागर
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. नेहा चालखुरे यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी डॉ. धनश्री शेंडे होत्या. या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे, उपस्थित पाहुणे आणि यशस्वी विद्यार्थ्यांना ‘भारतीय संविधानाची प्रस्तावना’ देऊन सन्मानित करण्यात आले. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत संविधानाची मूल्ये पोहोचावीत, हा यामागचा मुख्य उद्देश होता.
महानायिकांचे विचार कृतीत आणा : प्रा. वैशाली तुमराम
प्रमुख मार्गदर्शक प्रा. वैशाली तुमराम यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, “सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत केवळ जयघोष न करता महानायिकांचे विचार प्रत्यक्ष कृतीत आणणे हीच खरी गरज आहे.”
. याप्रसंगी मंचावर अश्विनी केळकर, डॉ. अनुषा मल्लोजवार, प्रा. सूर्यकांत खणके, शाहीन शेख उपस्थित होते. कार्यक्रमात मुख्य विजेत्यांसह इतर २० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ‘ग्रंथ’ देऊन गौरव करण्यात आला.
नियोजन आणि आभार
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विवेक बांबोळे यांनी केले. संचालन प्रा. शुभांगी मोहितकर व सुरज दहागावकर यांनी केले, तर आभार विशाल शेंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बहुजन मेडिकोज असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी मंचावर अश्विनी केळकर, डॉ. अनुषा मल्लोजवार, प्रा. सूर्यकांत खणके, शाहीन शेख उपस्थित होते.


