Home चंद्रपुर जिल्हा विशेष ‘आयसीपीआर’ महिला कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा इशारा

‘आयसीपीआर’ महिला कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा इशारा

374

चौकशीचा फेरा मागे लागताच अधिकाऱ्यांची समजूतकाढण्यासाठी पळापळ

मानधन कपात आणि मानसिक छळाचा प्रकार

पोलीस तक्रारीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दणाणले धाबे

वरोरा : येथील नागरी ग्रामसंघांतर्गत कार्यरत असलेल्या एका महिला ‘आयसीपीआर’ कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्याची धमकी, मानधनात कपात आणि सततचा मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या जाचाला कंटाळून पीडित महिलेने थेट आत्महत्येचा इशारा दिला असून, या प्रकरणाने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, पोलीस तक्रार होताच आता दोषी अधिकारी चौकशी टाळण्यासाठी मध्यस्थांमार्फत पीडित महिलेची ‘समजूत’ काढण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

धमक्या आणि मानधन कपात
मिळालेल्या माहितीनुसार, वरोरा तालुक्यातील नागरी येथील ग्रामसंघाने निवडलेली ही महिला कर्मचारी गावपातळीवर प्रामाणिकपणे सेवा देत आहे. मात्र, गेल्या काही काळापासून तिला “तू नीट काम करत नाहीस”, “तुला नोकरीवरून काढून टाकू” अशा शब्दांत धमकावण्यात येत होते. केवळ धमक्या देऊनच हे अधिकारी थांबले नाहीत, तर तिचे हक्काचे मानधन कपात करून तिचा प्रचंड मानसिक छळ करण्यात आला. शेवटी या त्रासाला कंटाळून महिलेने वरोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपली कैफियत मांडली.

पोलीस निरीक्षकांचे चौकशीचे आदेश
महिलेच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत वरोरा पोलीस निरीक्षकांनी तातडीने संवर्ग विकास अधिकाऱ्यांना (BDO) पत्र पाठवून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या पत्राने प्रशासकीय यंत्रणेत भूकंप झाला असून, चौकशीत दोषी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईची टांगती तलवार निर्माण झाली आहे.

अधिकाऱ्यांची सेटलमेंटसाठी धडपड
चौकशीचा ससेमिरा अंगाशी येणार असल्याचे लक्षात येताच, आतापर्यंत मुजोरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांनी केलेल्या आरोपांनुसार, हे अधिकारी आता पीडित महिलेवर दबाव टाकण्यासाठी किंवा तिची समजूत काढण्यासाठी मध्यस्थांचा वापर करत आहेत. “जर चौकशी झाली तर तुझीच नोकरी जाईल,” अशी भीती घालून तक्रार मागे घेण्यासाठी तिला वारंवार फोन करून गळ घातली जात असल्याचे समोर आले आहे.

वरिष्ठांच्या भूमिकेकडे लक्ष
या प्रकरणामुळे वरोरा तालुक्यात महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानीचा प्रश्न गंभीर झाला आहे. आता संवर्ग विकास अधिकारी या तक्रारीवर काय कारवाई करतात आणि पोलीस प्रशासन या प्रकरणातील ‘मध्यस्थी’ करणाऱ्यांवर काय पावले उचलते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

पीडित महिलेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार!

.        “जर अधिकारी दोषी नाहीत, तर मग पीडित महिलेची समजूत काढण्याची आणि फोन करण्याची गरज काय? हा प्रकार म्हणजे निव्वळ चौकशीपासून वाचण्याचा प्रयत्न आहे. आज या महिलेवर अन्याय झाला, उद्या तो दुसऱ्या कोणावरही होऊ शकतो. त्यामुळे आम्ही या लढाईत तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. तिला न्याय मिळेपर्यंत सर्व शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवू आणि या अन्यायाचा पर्दाफाश करू.”

 किशोर डुकरे, सामाजिक कार्यकर्ते

error: Content is protected !!