Home चंद्रपुर जिल्हा विशेष अडीच कोटींचा भूखंड विकला 15 हजारांत

अडीच कोटींचा भूखंड विकला 15 हजारांत

390

राखीव ७ भूखंडांची परस्पर विक्री

संताजी गृहनिर्माण संस्थेच्या स्वयंघोषित अध्यक्षाचा प्रताप

भद्रावतीत भूखंड विक्रीचा मोठा घोटाळा

सभासदांचा पत्रकार परिषदेत आरोप

भद्रावती : शहरातील संताजी नगर गृहनिर्माण संस्थेत मोठ्या आर्थिक अपहाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संस्थेचे सात मौल्यवान राखीव भूखंड सभासदांना अंधारात ठेवून परस्पर विकल्याचा गंभीर आरोप स्वयंघोषित अध्यक्षावर करण्यात आला असून, याप्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नेमके प्रकरण काय ?
सन १९८० मध्ये संताजी नगर गृहनिर्माण संस्थेची स्थापना करून चिचोर्डी येथील सर्व्हे क्रमांक १३१/३ ही शेतजमीन खरेदी करण्यात आली होती. या जागेवरील प्लॉट वाटपानंतर संस्थेच्या मालकीचे प्लॉट क्रमांक ८०, ८१, ८२, ८३, ८७, ८८ व ८९ असे एकूण सात भूखंड शिल्लक होते. २००७ मध्ये सभासदांनी लहानू सखाराम बावणे यांना संस्थेचे सर्वाधिकार दिले होते. मात्र, कालांतराने ते शहर सोडून निघून गेले. फेब्रुवारी २०२४ मध्ये सभासदांनी त्यांचे सर्व अधिकार रद्द केले होते.

अडीच कोटींची जागा कवडीमोलात विकली
अधिकार रद्द झालेले असतानाही, २० जुलै २०२४ रोजी बावणे यांनी इतर सभासदांना कोणतीही कल्पना न देता या सातही भूखंडांची विक्री केवळ १५ हजार रुपयांत उरकली. या भूखंडांची बाजारपेठ किंमत साधारण अडीच कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. जेव्हा खरेदीदार जागेच्या मोजमापासाठी आले, तेव्हा हा सर्व गैरप्रकार उघडकीस आला.

दोषींवर कारवाईची मागणी
या प्रकरणाच्या निषेधार्थ शनिवारी संताजी सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी बाबा तराळे, मारोतराव सहस्त्रबुद्धे, आनंद वाढई यांच्यासह अनेक सभासद उपस्थित होते. या अवैध विक्रीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच नगर परिषदेने या वादग्रस्त भूखंडांवर बांधकामास परवानगी देऊ नये, अशी मागणी सभासदांनी केली आहे.

योग्य चौकशी केली नसल्याचा पत्रकार परिषदेत आरो

प्लॉट विक्री प्रकरणात दुय्यम निबंधक, तलाठी व महसुल विभागातील अधिकाऱ्यांनी फेरफार मंजूर करताना योग्य चौकशी केली नसल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे. विक्रीसाठी संस्थेच्या स्वयंघोषित अध्यक्षाने २००७ च्या ठरावाची प्रत जोडली असून, संस्थेशी संबंध नसलेल्या दोन व्यक्तींकडून लहानू सखाराम बावणे हेच अध्यक्ष असल्याचे स्वयंघोषणापत्र घेतल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच फेरफार करताना संस्थेचे सचिव व सभासदांना कोणत्याही प्रकारची नोटीस देण्यात आली नसल्याचाही पत्रकार परिषदेत आरोप करण्यात आला आहे.

 

 

error: Content is protected !!