वरोरा तालुक्यात अवैध वाळू उपसा बेतली जीवावर
शेगाव पोलिसांत गुन्हा दाखल
वरोरा : तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ‘मशाचा पाट’ परिसरातून अवैध वाळू तस्करी सुरू असताना एका ३५ वर्षीय तरुण कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वनविभागाच्या पथकापासून वाचण्यासाठी वाळूचा ट्रॅक्टर वेगाने पळवत असताना ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
नेमकी घटना काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास मशाचा पाट येथून अवैध वाळू उपसा करून वाहतूक केली जात होती. याची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने वाळू तस्करांचा पाठलाग सुरू केला. पथकापासून वाचण्यासाठी वाळूने भरलेला ट्रॅक्टर वेगाने पळवण्यात येत होता. वाटेत खड्डा आल्याने ट्रॅक्टर थांबवावा लागला. यावेळी ट्रॅक्टरचे वजन कमी करून पळ काढण्याच्या उद्देशाने चालकाने हायड्रोलिक ट्रॉली वर केली. मात्र, याच दरम्यान ट्रॅक्टरवर बसलेला कामगार प्रवीण वसंत दडमल (३५, रा. चारगाव बु.) हा खाली पडला आणि त्याच्या अंगावर वाळूचा ढीग कोसळल्याने गुदमरून त्याचा जागीच मृत्यू झाला.
तस्करांचे पलायन आणि पोलीस कारवाई
आपला साथीदार वाळूखाली दबल्याचे पाहून ट्रॅक्टरवरील इतर कामगार आणि चालक घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच शेगाव पोलीस स्टेशनचे तपासी अधिकारी पीएसआय कांबळे यांनी पथकासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिसांनी या प्रकरणी बीएनएस कलम १०६(१) अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
अवैध तस्करीचे जाळे उघड
या भीषण घटनेमुळे शेगाव आणि वरोरा परिसरातील अवैध वाळू उपशाचे गंभीर वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. रात्रीच्या अंधारात छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणावर वाळूची चोरी केली जात असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. सध्या पोलीस आणि वनविभाग यांच्याकडून या प्रकरणाची संयुक्त चौकशी सुरू असून, यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


