Home सामाजिक भद्रावतीत पत्रकार दिनानिमित्त आंतरशालेय समूह नृत्य स्पर्धेचा थरार

भद्रावतीत पत्रकार दिनानिमित्त आंतरशालेय समूह नृत्य स्पर्धेचा थरार

362

भांदक प्रेस क्लबचा उपक्रम

विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव आणि चिमुकल्यांच्या कलाविष्काराला दाद

भद्रावती : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘पत्रकार दिनानिमित्त’ भद्रावती शहरात आंतरशालेय समूह नृत्य स्पर्धा आणि मान्यवरांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. भांदक प्रेस क्लबच्या वतीने आयोजित या सोहळ्याला भद्रावती शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

.        कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने आणि बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आभासी (व्हर्च्युअल) माध्यमातून उपस्थितांना संबोधित केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भद्रावतीचे नगराध्यक्ष प्रफुल चटकी, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, दैनिक पुण्यनगरीचे जिल्हा प्रतिनिधी मंगेश खाटिक, दैनिक नवजीवनचे जिल्हा प्रतिनिधी रवी खाडे, इंटक नेते धनंजय गुंडावर, काँग्रेस नेते धर्मेंद्र हवेलिकर, शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. युवराज धानोरकर, संवर्ग विकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांची उपस्थिती होती.

.      याप्रसंगी आयोजित आंतरशालेय समूह नृत्य स्पर्धेत शहरातील विविध शाळांनी सहभाग घेतला होता. ‘देशभक्ती’ आणि ‘सामाजिक प्रबोधन’ या विषयांवर आधारित नृत्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. आपल्या पाल्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळाल्याबद्दल पालकांनी व शिक्षकांनी आयोजकांचे आभार मानले.

.      या सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा आणि पत्रकारिता क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या स्थानिक पत्रकारांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. “पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील ज्वलंत प्रश्न मांडण्यासोबतच सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम अशा कार्यक्रमांतून होते,” असे विचार मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.

विजेत्या शाळा व महाविद्यालयांवर बक्षिसांची बरसात

या स्पर्धेत दोन गट करण्यात आले होते. ‘अ’ गटामध्ये विवेकानंद स्कूल, भद्रावती यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर श्री साई कॉन्व्हेन्ट ने द्वितीय आणि लोकमान्य हायस्कूल ने तृतीय क्रमांक मिळवला. ‘ब’ गटामध्ये लोकमान्य महाविद्यालय प्रथम, फेयरी लँड कॉलेज द्वितीय, तर विवेकानंद महाविद्यालय तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. सर्व विजेत्या व उपविजेत्या संघांना रोख पारितोषिक, आकर्षक चषक आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

आयोजकांचे परिश्रम

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भांदक प्रेस क्लबचे अध्यक्ष सुधीर पारधी, उपाध्यक्ष सुनील पतरंगे, सचिव वतन लोने, सह-सचिव सुनील बिपटे, कोषाध्यक्ष अब्बास अजानी, कार्याध्यक्ष ईश्वर शर्मा आणि मार्गदर्शक अशोक पोद्दार यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. यशवंत घुमे होते.

.      कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील बिपटे यांनी केले, तर सूत्रसंचालन वतन लोने व सुनील पतरंगे यांनी प्रभावीपणे सांभाळले. शेवटी उपस्थितांचे आभार ईश्वर शर्मा यांनी मानले. या सोहळ्यामुळे भद्रावतीच्या सांस्कृतिक वातावरणात मोठी भर पडली असून सर्वत्र कौतुक होत आहे.

error: Content is protected !!