वरोऱ्यात १७ वर्षीय मुलाच्या पालकांकडून २५ हजार रुपये दंड वसूल
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वरोरा पोलिसांची मोठी कारवाई
दंडाची रक्कम ‘पब्लिक वेल्फेअर’ खात्यात जमा
वरोरा : शहरातील शासकीय बाग परिसरात प्रतिबंधित नायलॉन मांजाने पतंग उडविणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर वरोरा पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. या मुलाच्या पालकांकडून प्रशासनाने २५ हजार रुपये दंड वसूल केला असून, ही रक्कम तात्काळ उच्च न्यायालयाच्या ‘पब्लिक वेल्फेअर’ खात्यात क्यूआर कोड स्कॅन करून जमा करण्यात आली आहे.
नेमकी घटना काय ?
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नायलॉन मांजाच्या खरेदी, विक्री आणि वापरावर कडक बंदी घातली आहे. असे असतानाही शासकीय बाग परिसरात एक १७ वर्षीय बालक प्रतिबंधित नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडवताना मिळून आला. वरोरा पोलिसांनी तत्परतेने या बालकावर कारवाई करत त्याच्या पालकांना पोलीस स्टेशनमध्ये पाचारण केले.
न्यायालयाच्या निर्देशानुसार दंड
नायलॉन मांजा मानवी जीव आणि पक्ष्यांसाठी अत्यंत घातक असल्याने उच्च न्यायालयाने या संदर्भात कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, वरोरा पोलिसांनी पालकांकडून २५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. विशेष म्हणजे, दंडाची ही रक्कम थेट उच्च न्यायालयाच्या ‘पब्लिक वेल्फेअर’ खात्यात ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात आली.
पोलिसांचे आवाहन
नायलॉन मांजा वापरणे हा गुन्हा आहे. पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे आणि प्रतिबंधित मांजाचा वापर टाळावा, अन्यथा अशीच कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा वरोरा पोलीस प्रशासनाने दिला आहे. या कारवाईमुळे नायलॉन मांजा वापरणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.


