Home चंद्रपुर जिल्हा विशेष रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात युवासेनेचा एल्गार

रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात युवासेनेचा एल्गार

363

मुनेश्वर बदखल १६ जानेवारीपासून बसणार आमरण उपोषणाला

सुमठाणा-तेलवासा मार्गाची ७ वर्षांपासून दयनीय अवस्था

वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष

भद्रावती : तालुक्यातील सुमठाणा ते तेलवासा, कोच्ची, घोनाड आणि पिंपरी या गावांना जोडणारा मुख्य रस्ता गेल्या ७ ते ८ वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. या रस्त्यावरील मोठमोठे खड्डे आणि खराब डांबरीकरणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवासेना विधानसभा प्रमुख मुनेश्वर बदखल यांनी १६ जानेवारी २०२६ पासून आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे.

प्रशासनाच्या उदासीनतेचा निषेध
गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तहसीलदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) वारंवार निवेदने देण्यात आली. मात्र, प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळाली, प्रत्यक्ष काम झाले नाही. याच उदासीन आणि बेजबाबदार भूमिकेचा निषेध म्हणून हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आतापर्यंत अनेक निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत, तरीही प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचा आरोप युवासेनेने केला आहे.

उपोषणाचे ठिकाण आणि वेळ
हे आमरण उपोषण युवासेना महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य हर्षल शिंदे व युवासेना जिल्हा प्रमुख आलेख रट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच लोकसभा सचिव सुरज शाहा व जिल्हा संघटक सुमित हस्तक यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता, भद्रावती तहसील कार्यालयाच्या बाजूला, सार्वजनिक बांधकाम विभाग गेस्ट हाऊससमोर हे उपोषण सुरू होईल.

जोपर्यंत काम नाही, तोपर्यंत माघार नाही
जोपर्यंत सुमठाणा-तेलवासा रस्त्याच्या कामाबाबत प्रशासनाकडून ठोस लेखी आश्वासन मिळत नाही आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नाही, तोपर्यंत हे उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा इशारा मुनेश्वर बदखल यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे आता तरी प्रशासनाला जाग येणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!