Home चंद्रपुर जिल्हा विशेष ​महाराष्ट्र ग्रामीण बँकेवर दरोडा; १७० ग्रॅम सोन्यासह रोकड लंपास

​महाराष्ट्र ग्रामीण बँकेवर दरोडा; १७० ग्रॅम सोन्यासह रोकड लंपास

426

सुट्टीचा फायदा घेत चोरट्यांचा बँकेवर डल्ला

​मोहाडी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील घटना

खातेदारांमध्ये खळबळ

​नागभीड : तालुक्यातील मोहाडी (मोकासा) येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत अज्ञात दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकून १७० ग्रॅम सोने आणि ३ लाख ६६ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. हा प्रकार आज सोमवारी सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास बँक उघडल्यानंतर उघडकीस आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि खळबळीचे वातावरण निर्माण झाले आहे.

.        ​ मिळालेल्या माहितीनुसार, मोहाडी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या सह-व्यवस्थापक धकाते यांनी शुक्रवारी सायंकाळी 6.30 वाजता बँक नियमानुसार बंद केली होती. दरम्यान, शनिवारी आणि रविवारी सुट्टी असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी बँकेत शिरकाव केला. आज सोमवारी सकाळी 9.30 वाजता बँक उघडण्यासाठी कर्मचारी आले असता, त्यांना बँकेतील सामानाची उचकापाचक झालेली दिसली. बँकेच्या तिजोरीतून १७० ग्रॅम वजनाचे दागिने आणि ३ लाख ६६ हजार रुपये चोरीला गेल्याचे व्यवस्थापक शेख मोहसीन शेख यांच्या लक्षात येताच नागभीड पोलिसांना माहिती देण्यात आली.

.       ​ बँकेत दरोडा पडल्याची माहिती मिळताच नागभीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बँकेचे व्यवस्थापक शेख मोहसीन शेख यांनी नागभीड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ पंचनामा केला असून शोध मोहीम राबवली जात आहे. तपासासाठी शासनाची फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून ठसे तज्ज्ञांमार्फत पुरावे गोळा केले जात आहेत.

.      ​ उपविभागीय पोलीस अधिकारी डी. डी. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक रमाकांत कोकोटे यांच्या नियंत्रणाखाली तपास सुरू आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर वैरागडे आणि त्यांची चमू दरोडेखोरांचा शोध घेत आहे. बँकेतील सीसीटीव्ही फुटेज आणि परिसरातील संशयास्पद हालचालींची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

error: Content is protected !!