Home चंद्रपुर जिल्हा विशेष ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच ला राजकीय पक्षाचे चिन्ह द्या !

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच ला राजकीय पक्षाचे चिन्ह द्या !

519

विसापूर ग्रामपंचायतीने केला ठराव पारित

राज्य निवडणूक आयोगाकडे करणार मागणी

बल्लारपूर : तालुक्यात विसापूर ग्रामपंचायत सर्वात मोठी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. मतदारांची संख्या ८ हजार १0७ इतकी आहे. या ग्रामपंचायतीची मुदत ५ फेब्रुवारी २०२६ रोजी संपत आहे. यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणूक दरम्यान सरपंच पदाची निवड मतदारांतून थेट होण्याची शक्यता आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सरपंच पदाच्या निवडीसाठी राजकीय पक्षाचे चिन्ह द्यावे, असा मासिक सभेत ठराव पारित केला आहे. असा ठराव करणारी विसापूर ग्रामपंचायत जिल्ह्यात पहिली असल्याची माहिती आहे. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात येणार असल्याची माहिती उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांनी दिली.

.       विसापूर ग्रामपंचायतीच्या इतिहासात आगामी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक पहिल्यांदाच सरपंच पदाची निवड थेट मतदारांतून केली जाण्याची शक्यता आहे.येथील ग्रामपंचायत मध्ये आजतागायत १२ सरपंचानी गावाच्या विकासासाठी हातभार लावला आहे. येथील सदस्य संख्या १७ आहे. यापूर्वी येथील सदस्यांमधून सरपंच व उपसरपंच पदाची निवड केली जात होती. आता मात्र राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सरपंच थेट मतदारांतून निवडून येणार आहे. यामुळे सरपंच पदाच्या निवडणुकीत असणाऱ्यांना राजकीय पक्षाचे चिन्ह देण्यात यावे, म्हणून विसापूर ग्रामपंचायत सदस्यांनी ठराव पारित केला.

.       स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिकेच्या निवडणुकीत राजकीय पक्षांच्या चिन्हावर लढविल्या जात आहे. त्याच धर्तीवर ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडीसाठी राजकीय पक्षाचे चिन्ह बहाल करण्यात यावे,असा प्रस्ताव सरपंच वर्षा कुळमेथे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिक सभेत उपसरपंच अनेकश्वर मेश्राम मांडला. याला एक सदस्य वगळता सर्वांनी प्रस्ताव मंजूर केला.

विसापुरात पाचव्यांदा मिळणार महिलेला सरपंच पदाची संधी                                                                                                                बल्लारपूर तालुक्यात विसापूर एकमेव १७ सदस्यांची मोठी ग्रामपंचायत आहे. ग्रामीण भागात सरपंच पदाला विशेष महत्व आहे. यामुळे अनेकांचा सरपंच होण्याकडे कल आहे. येथील आगामी सरपंच पद नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलेला आरक्षीत झाले आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या इतिहासात पाचव्यांदा महिला सरपंच होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी येथील सरपंच पदी संध्या पेंदोर, सुभद्रा धुर्वे, रिता जिलटे व विद्यमान सरपंच वर्षा कुळमेथे यांनी गावाचा कारभार केला.पहिले सरपंच होण्याचा मान यादवराव येज्ञूरवार यांना मिळाला आहे. त्यानंतर काशिनाथ ईटनकर यांनी १५ वर्षे,विठोबा गौरकार यांनी १0 वर्षे,रामभाऊ टोंगे यांनी १0 वर्षे, भारद्वाज जीवने, बंडू गिरडकर, ढीवरू सिडाम यांनी येथे सरपंच म्हणून कार्यभार पार पाडला आहे. पंढरीनाथ गिरडकर यांचा कार्यकाळ केवळ १२ दिवस आहे. आता मात्र पाचव्यांदा कोणत्या महिलेच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडते,यांकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!