Home चंद्रपुर जिल्हा विशेष वर्धा नदीत बुडून दोन मुलांचा मृत्यू ; दोन सुखरूप

वर्धा नदीत बुडून दोन मुलांचा मृत्यू ; दोन सुखरूप

537

गुराख्याने दाखवली तत्परता

दोघांचे प्राण वाचले

 रेस्क्यू टीमकडून दोघांचा शोध सुरूच

वरोरा  : तालुक्यातील तुळाणा गावाजवळ असलेल्या वर्धा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या चार मित्रांपैकी दोघे खोल पाण्यात बुडाले तर गुराख्याच्या तत्परतेने दोन मुलांचे प्राण वाचले. बुडालेल्या दोघांचा रेस्क्यू टीमकडून शोध सुरू असून वरोरा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

.          वरोरा तालुक्यातील तुळाणा गावाजवळून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या पात्रात रविवारी दिनांक २ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. वरोरा शहरातील कर्मवीर वार्डातील रुपेश विजेंद्र कूळसंगे (१३) आणि प्रणय विनोद भोयर (१५) हे दोघे मित्र आपल्या आणखी दोन साथीदारांसह सायकलने पोहण्यासाठी नदीवर गेले होते. सुरुवातीला कमी पाण्यात ते पोहत होते, मात्र पोहता पोहता खोल पाण्यात गेल्याने चारही मुले बुडू लागली. त्यांचा आरडाओरड ऐकून जवळच गुरे चारत असलेला गुराखी घटनास्थळी धावत आला. प्रसंगावधान राखत त्याने पाण्यात उडी मारली आणि उमंग धर्मेंद्र आत्राम व कृष्णा चंद्रकांत कुईजडे या दोघा मुलांना सुखरूप बाहेर काढले. पण रुपेश आणि प्रणय हे दोघे खोल पाण्यात ओढले गेले.

.          घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील बंडू ढेंगळे यांनी वरोरा पोलिसांना कळविले. तत्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले व चंद्रपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले. रेस्क्यू टीमने संध्याकाळपर्यंत अथक प्रयत्न करून नदीपात्रात शोधमोहीम राबविली, परंतु अंधार वाढल्याने मोहीम थांबवावी लागली. सोमवारी सकाळपासून पुन्हा बुडालेल्या दोन्ही मुलांचा शोध घेण्याचे कार्य सुरू होणार आहे.

.          या घटनेने वरोरा शहरात आणि तुळाणा परिसरात शोककळा पसरली आहे. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने नदीकाठावर गर्दी केली होती. गुराख्याच्या धाडसी कृतीमुळे दोन जीव वाचले, मात्र अजून दोन निष्पाप बालकांचा शोध सुरू असल्याने संपूर्ण वरोरा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!