Home चंद्रपुर जिल्हा विशेष भरधाव ट्रॅव्हल्सने दुचाकी स्वारास चिरडले

भरधाव ट्रॅव्हल्सने दुचाकी स्वारास चिरडले

584

चंद्रपूर नागपूर मार्गावरील सायवन फाट्यावरील घटना

महामार्गावरील खड्ड्‌यानी घेतला निखिलचा बळी

टोल कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागावर कारवाईची मागणी

चंद्रपूर : बल्लारपूर तालुक्यातील दहेली येथून भद्रावती तालुक्यातील माजरी येथे काकाच्या घरी महालक्ष्मी चे जेवण करण्यासाठी दुचाकीने येत असताना चंद्रपूर कडून नागपूर कडे जात असलेल्या भरधाव ट्रॅव्हल्स ने दुचाकीला मागून जबर धडक दिली. या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर नागपूर महामार्गवरील घोडेपेठ जवळ असलेल्या सायवन गावाजवळ मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास घडली. निखिल कृष्णराव झाडे (24) असे मृतक युवकाचे नाव आहे.

.        प्राप्त माहितीनुसार बल्लारपूर तालुक्यातील दहेली येथील निखिल झाडे हा भद्रावती तालुक्यातील माजरी येथे राहत असलेल्या काकाच्या घरी महालक्ष्मी चे जेवण असल्याने काकाकडे दुचाकीने येत होता. दरम्यान घोडपेठ गावाजवळील सायवन फाट्यावर भरधाव ट्रॅव्हल्स क्रमांक MH 37 T 9003 ने निखिल च्या दुचाकीला मागवून जबर धडक दिली. यात निखिल चा जागीच मृत्यू झाला. मृत निखिल हा नुकताच पशुवैद्यकीय शिक्षणाचा डिप्लोमा पूर्ण करून पुढील वाटचाल सुरू करणार होता. वडिलांच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती. एकुलता एक असलेल्या निखिलच्या आकस्मिक दुर्दैवी मृत्यूने दहेली व माजरी गावात शोककळा पसरली आहे. या अपघातामुळे पुन्हा एकदा प्रश्न उभा राहिला आहे की, जीवघेणे महामार्ग आणि निष्काळजी प्रशासन या दुहेरी संकटाला सामान्य नागरिक आणखी किती काळ बळी पडणार? असा सवाल वाहनधारक करीत आहे.

महामार्गावरील खड्ड्‌यांनी घेतला जीव                                                                                                                                               चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील खड्डे हे अपघातांना आमंत्रण देत आहेत. रोज वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. टोल वसुली मात्र वाढवली जात असताना रस्त्याच्या देखभालीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व टोल कंपनी दोन्ही दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या रस्ते दुरुस्ती करा नाहीतर टोल वसुली बंद करा अशा इशाऱ्यानंतर काही प्रमाणात थातुरमातुर डागडुजी झाली होती. मात्र पावसाने रस्त्यांची अवस्था जैसे थे च झाली आहे. यामुळे अपघाताची श्रृंखला मात्र सुरूच आहे. 

अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा                                                                                                                                     या अपघातानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. निखिलच्या मृत्यूस जबाबदार टोल कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभाग असून या दोन्ही विभागातील अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी ठाम मागणी माजी पंचायत समिती उपसभापती भोजराज झाडे व माजी नगरसेवक अफजल भाई यांनी केली आहे.

error: Content is protected !!