शेतकरी चिंताग्रस्त
ओला दुष्काळ जाहीर करून किमान कर्जे माफी देण्याची मागणी
भद्रावती : तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या काही दिवसापासून सुरू असलेली पावसाची मालिका कधी मुसळधार तर कधी रिपरिप यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. हजारो हेक्टरवरील शेतात पाणी साचल्याने कापूस, तूर सोयाबीन पिकाची पाळेमुळे जमिनीत घट्ट होत नाही पर्यायाने पिकाची वाढ खुंटते, पुरेशा सूर्यप्रकाशा अभावी उभी पिके रोगट व पिंगट होऊन पीक सडत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
. शेतकऱ्यांच्या मते, अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पाणी साचल्याने पिकांचे श्वसन थांबले असून, मुळांची वाढ खुंटली आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट होणार असून, या वर्षी उत्पादनाचा अंदाज पूर्णपणे कोलमडला आहे. पिक कर्ज काढून खते, बियाने, मशागत, निंदन खर्च अवाढव्य झाला मात्र यावेळी उत्पादन मात्रा अत्यल्प राहील त्यामुळे कर्ज फेडायचे कसे आणि प्रपंच चालवायचा कसा अशा विवंचनेत शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे दृश्य तालुक्यात दिसून येते आहे.
. शासनाने भद्रावती तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून व तातडीने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी पिडित शेतकऱ्या कडून केली जात आहे. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना त्वरित भरपाई मिळावी, अशीही मागणी शेतकरी करत आहे.
. ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा घेतला आहे, त्यांनी नुकसान झाल्यापासून ७२ तासांच्या आत विमा कंपनी यांच्याकडे नोंद करावी, असे आवाहन कृषी विभागाने देखील केले आहे. हे नुकसान भरपाई मिळवण्यासाठी महत्त्वाचे आहे.
शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया
आम्ही बरेच दिवसांपासून मेहनत घेतली कापूस, तूर पिकांची लागवड केली.या पिकाची निगा राखली हजारो रुपयांची खते तसेच औषधी फवारणी केली.अनेक मजुरांना मजुरी देऊन काम करवून घेतलं आणि आता कुठे फुल पाती, बोंडे धरण्यास सुरुवात होणार होती अशातच निसर्गाने आपले रौद्ररूप धारण केले. आणि त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. शंकर पेटकर, शेतकरी केसुर्लि
आमची शासनाला अशी आग्रहाची विनंती आहे की त्यांनी भद्रावती तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचा पंचनामा करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी आणि लोकप्रतिनिधींनी सुद्धा यात लक्ष घालून आम्हाला योग्य असा न्याय द्यावा. सचिन बिपटे, कुणाडा, पिडित शेतकरी


