कांग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
गणेशोत्सव विसर्जन दरम्यान होणार अडचण
बल्लारपूर : रेल्वे प्रशासनाने वस्ती भागाला जोडणाऱ्या गोल पुला दरम्यान नव्याने पुल निर्माण करण्याचे बांधकाम सुरु केले आहे. याला सहा महिन्याचा कालावधी झाला आहे. यामुळे वाहतुकधारकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. गणेशोत्सव दरम्यान मुर्ती विसर्जन सोहळा या प्रकारामुळे प्रभावित होणार आहे. बल्लारपूर येथील गोल पुलाचा मार्ग तातडीने पूर्ण करा, असे निवेदन बल्लारपूर शहर कांग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी विशाल वाघ यांना शुक्रवारी दिले.
. बल्लारपूर शहर रेल्वे मार्गामुळे विभागले आहे. गोल पूल हाच मुख्य मार्ग वस्ती भागाला जोडतो. यामुळे या मार्गावर नेहमी वर्दळ असते.सदर मार्गादरम्यान नवीन पुलाचे बांधकाम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. मात्र बांधकामाची गती कासवगतीने केली जात आहे. परिणामी या मार्गाने ये – जा करणाऱ्यांना अडचण सहन करावी लागत आहे.
अशातच गणेशोत्सव सुरू झाला आहे. वर्धा नदीच्या गणपती घाटावर विसर्जन सोहळा घेतला जातो.यामुळे गणेश भक्तांना याचा चांगलाच त्रास होणार आहे.
. गोल पूल दरम्यान बांधकाम रेल्वे प्रशासनाने तातडीने पूर्ण करणे, आवश्यक होते. मात्र रेल्वे प्रशासनात चालढकल धोरण अवलंबले आहे. याबाबत अनेकदा रेल्वे प्रशासनाला व नगरपालिका प्रशासनाला अवगत करण्यात आले. मात्र लक्ष देण्यात आले नाही. सणासुदीच्या दिवसात गोल पुलाचा मार्ग सुरळीत करण्याची आग्रही मागणी शहर कांग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
. यावेळी शिष्टमंडळात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव घनश्याम मुलचंदानी, शहर कांग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र आर्य, माजी नगराध्यक्ष छाया मडावी, माजी नगरसेवक भास्कर माकोडे, आनंद कटारे, नरसिंग रेब्बावार, लखपती घुगलोत यांच्या सोबत अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.


