भद्रावती : मानवासाठी आरोग्यवर्धक असलेल्या नैसर्गिक रानभाज्या या दिवसेंदिवस लोप पावत चाललेल्या आहे. त्यामुळे त्याचा मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून पुन्हा त्या पारंपारिक रीतीने त्याच्या आहारात वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून त्याची माहिती व्हावी आणि रोजच्या आहारामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात वापर व्हावा. या दृष्टिकोनातून चंदनखेडा येथे तालुका कृषी अधिकारी व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत रानभाज्या महोत्सव साजरा करण्यात आला.
. या महोत्सवाचे उद्घाटन उपविभागीय कृषी अधिकारी कविता हरिणखेडे यांनी चंदनखेडा फार्मर प्रोडूसर कंपनीचे संचालक संतोष खडककर यांचे अध्यक्षतेखाली केले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी सुशील आडे, मंडळ कृषी अधिकारी विकास चवले, पर्यावरण मित्र संस्थेचे शंकर भरडे, प्रगतशील शेतकरी किशोर ठावरी व भिवधरे प्रामुख्याने उपस्थित होते.
. या महोत्सवात भद्रावती तालुक्यामधील आजूबाजूच्या गावातील लोकांनी भेट देऊन माहिती घेतली. विविध स्टॉलवरून प्रदर्शनीत असलेल्या वस्तू व खाद्यपदार्थ खरेदी केले. तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध रानभाज्या प्रदर्शनी व विक्रीसाठी आणलेल्या होत्या. त्यात प्रामुख्याने पर्यावरण मित्र संस्थेने संस्थेचे अध्यक्ष अँड विजय देठे यांचें मार्गदर्शनाखाली रानभाज्या सोबतच ज्येष्ठ नागरिकांनी बनवलेले कागदी लिफाफे व थैले, औषधी वनस्पतीचे उत्पादन, जन जागृतीसाठी वनहक्क आणि रोजगार हमीचे पुस्तीका व माहिती पत्रके हे या महोत्सवाचे विशेष आकर्षण होते.
. यानिमित्त झालेल्या मुख्य कार्यक्रमात रानभाज्यामध्ये असलेले विविध प्रकारचे गुणधर्म, नेहमीच्या आहारामधील रानभाज्यांचे महत्त्व, मानवी आहारात रानभाज्यांची गरज, रानभाज्यांमधील असलेले विविध औषधी गुणधर्म व त्यातील उपलब्ध जीवनसत्वे, रानभाज्यांचे संवर्धन, संरक्षण आणि त्यांचे व्यवस्थापन या विषयावर कार्यक्रमाचे उद्घाटक तथा उपविभागीय कृषी अधिकारी कविता हरिणखेडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा चंदनखेडा फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक संतोष खडतकर आणि प्रमुख पाहुणे पर्यावरण मित्रचे शंकर भरडे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात निवडक प्रयोगशील शेतकरी यांचा मान्यवरांचे हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. महोत्सवात सक्रिय सहभाग देणा-यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा चे अमोल दहेगावकर, तालुका उप कृषी अधिकारी व शेतकरी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे संचालन उप कृषी अधिकारी विजय कवाडे व आभार प्रदर्शन उपक्रम कृषी अधिकारी हर्षल इथे यांनी केले.


