Home चंद्रपुर जिल्हा विशेष बाजार चौकातील अतिक्रमणावर नपचा बुलडोजर

बाजार चौकातील अतिक्रमणावर नपचा बुलडोजर

892

नागरिकांचे समाधान

फुटपाथ दुकानदारांवर उपासमारी

सिंदेवाही : नगर पंचायत कार्यालय सिंदेवाही यांनी शहरातील मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू केली असून बुधवारी दुपारी नगर पंचायत प्रशासना कडून अतिक्रमण काढण्यात आले असल्याने अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मात्र रस्त्यावरील दुकाने हटविण्यात आले असल्याने अनेक दुकानदारांवर उपासमारी आली असल्याची भावना दुकानदारांनी व्यक्त केली आहे.

.      सिंदेवाही हे तालुक्याचे ठिकाण असून नगर पंचायत कार्यालय समोरील बाजार चौकात मुख्य बाजार पेठ असून शहरातील दुकाने वाढली असल्याने अनेकांनी रस्त्याच्या कडेला आपली दुकाने थाटली होती. त्यामुळे नागरिकांना बाजार चौकातून मार्गक्रमण करणे खूपच त्रासाचे झाले होते. दुचाकी गाडी काढणे , सायकल चालवणे , यांना सुद्धा त्रास सहन करावा लागत होता. दुकानासमोर दुचाकी गाडी उभी करून सामान खरेदी करावे लागत होते. याबाबत अनेक नागरिकांनी नगरसेवकांकडे बोलून आपली खंत व्यक्त केली होती. त्यामुळे बुधवारी दुपारी नगर पंचायत कार्यालयाने अतिक्रमणाचा बडगा उचलत शहरातील गजबजलेल्या बाजार चौकातील दुकानासमोरील लावलेले टिनाच्या पत्र्याचे शेड काढून , तसेच रस्त्याच्या कडेला असलेले दुकाने हटवून मार्ग मोकळा करून दिला असल्याने अनेक नागरिकांनी नगर पंचायत कार्यालयाचे आभार मानले आहेत.

.      मात्र दुसरीकडे रस्त्याच्या कडेला हातठेले लावून दिवसभर धंदा करून आपला उदरनिर्वाह करणारे फुटपाथ दुकानदार उघड्यावर पडले असल्याने त्यांचेवर उपासमारीची पाळी आली असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली आहे. सदर अतिक्रमण मोहीम नगराध्यक्ष भास्कर नन्नावार यांचे पुढाकारात झाली असून यावेळी नगर पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कंकाळ, पोलिस निरीक्षक विजय राठोड, नगरसेवक मयुर सूचक, किशोर भरडकर, नगर अभियंता मनोज आंबोरकर, प्रशासकीय मुकेश तिरवले, लेखापाल सूरज गायकवाड, इंजिनियर नूतन कोरडे, सुधीर ठाकरे, अनिकेत मानकर, दिवाकर निकुरे, संजय रामटेके, संजय वाकडे, विनोद काटकर, चेतन राऊत इत्यादी नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!